औरंगाबादेत कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेना आमदार, माजी महापौरांसह 15 जणांवर गुन्हा

| Updated on: Sep 06, 2020 | 4:02 PM

आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Filed Against Shiv Sena Mla Ambadas Danve)

औरंगाबादेत कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेना आमदार, माजी महापौरांसह 15 जणांवर गुन्हा
Follow us on

औरंगाबाद : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतवर टीकेची झोड उठली होती. राजकीय क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही कंगनाला चांगलीच समज दिली. याप्रकरणी औरंगाबादेत निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आंदोलनकर्त्या शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad Agitation Against Kangana Ranaut Case Filed Against Shiv Sena Mla Ambadas Danve And Nandkumar Ghodele )

कंगना रनौतने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरील वादग्रस्त ट्विटनंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. याप्रकरणी निषेध व्यक्त करत शिवसैनिकांनी 4 सप्टेंबरला औरंगाबादेतील क्रांती चौकात आंदोलन केलं होतं. यावेळी तिच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली होती.

याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीचे उल्लंघन करणे, विनापरवाना निदर्शने केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार कचरु रामराम निकम यांनी याबाबतची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

त्यानंतर आंदोलन करणाऱ्या एका आमदारासह शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात, गिरजाराम हळनोर, सचिन खैरे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण जाधव, पप्पू कुलकर्णी यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा – Kangana Ranaut | मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अभिनेत्री कंगनाला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता. यानंतर सर्वत्र ट्विटर वॉर सुरु झाले होते. यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्याशिवाय अनेक नेत्यांनी याबाबत विविध प्रतिक्रिया देत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला होता. (Aurangabad Agitation Against Kangana Ranaut Case Filed Against Shiv Sena Mla Ambadas Danve And Nandkumar Ghodele)

संबंधित बातम्या : 

कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही, महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, आवाज उठवू : संजय राऊत

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला