औरंगाबादः राज्यात सध्या अगदी सामान्य जनतेतून निवडलेले लोकप्रतिनिधी उच्च पदावर पोहोचतायत, असं चित्र निर्माण झालंय. राजकारण (Maharashtra politics) तर चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला यांच्याभोवतीच फिरतंय. नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेदेखील रिक्षावाला होते. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्याही वेगाने लोकांमध्ये व्हायरल झाल्या. कदाचित ही बाब पाहिल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांना रिक्षा चालवण्याचा मोह आवारला नाही. औरंगाबादेत त्यांनी आज रिक्षा चालवण्याची हौस भागवली. औरंगाबाद आणि परिसरात खा. जलील यांनी रिक्षा चालवतानाचा हा व्हिडिओ तुफ्फान व्हायरल होतोय.
झालं असं की खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या घरासमोर एका कार्यकर्त्याची रिक्षा पाहिली. त्यानंतर त्यांना ही रिक्षा चालवावी वाटली. त्यांनी रिक्षा चालकाकडे ही इच्छा बोलून दाखवली. आता खुद्द खा. जलील यांनी मागणी केल्यावर कार्यकर्त्यानेही खुशाल त्यांच्या हाती रिक्षाची चाबी सोपवली. खा. जलील यांनीही दिमाखात रिक्षा स्टार्ट केली आणि फेरफटका मारण्यासाठी पुढे निघाले… चालकाने या घटनेटा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे नामांकित पत्रकार होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते उतरले आणि आमदार झाले. आमदारकीची पाच वर्ष पूर्ण होताच त्यांना लोकसभेचीही उमेदवारी मिळाली. औरंगाबादमध्ये तगडा पक्ष असलेल्या शिवसेनेला शह देत, चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत ते खासदारपदी विराजमान झाले. तेव्हापासून औरंगाबादमध्ये शिवसेनेला तगडी फाईट देणारा पक्ष आणि नेता म्हणून एमआयएम तसेच खा. जलील यांच्याकडे पाहिले जातेय. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेतील मोठी फूट, भाजपतील अंतर्गत राजकारण या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील कधी काळी रिक्षा चालवत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लहानपणी रेल्वेस्टेशनवर चहा विकला होता. खुद्द पंतप्रधानांनीच हा किस्सा सांगितलेला. तेव्हापासून एक चहावाला देखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असं म्हटलं जातंय. आता तर रिक्षा चालवण्याचं काम केलेले एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हेदेखील टपरी चालवत होते, असेही सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर खा. जलील यांनीदेखील रिक्षा चालवून पाहिला.. एमआयएमचे कार्यकर्ते आणि खा. जलील यांच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ तुफ्फान व्हायरल केलाय.