औरंगाबाद : मनसे आणि भाजपच्या जवळीकतेची चर्चा असताना, दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते भेटीगाठी घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आधी नाशिकमध्ये मग मुंबईत राज ठाकरेंच्या घरी भेट झाली. या भेटीनंतर आता पदाधिकाऱ्यांच्याही भेटी होण्याची चर्चा आहे. औरंगाबादेत आज मनसे आणि भाजपची (Aurangabad Municipal Election) बैठक होण्याची शक्यता आहे. शासकीय विश्राम गृहावर ही बैठक नियोजित आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे पहिल्या फळीतील नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वत: या बैठकीला हजर राहण्याची चर्चा आहे. दरेकर आणि आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आगामी रणनीतीबाबत चर्चेची चिन्हं आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद महापालिकेत मनसे आणि भाजप युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मनसे भाजप बैठकीच्या शक्यतेने औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.
औरंगाबाद महापालिकेचा कार्यकाळ संपून वर्ष उलटले आहे. आधी गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच निवडणुका स्थगित झाल्यामुळे औरंगाबाद महापालिका इलेक्शनलाही ब्रेक लागला होता. नंतर औरंगाबादमधील प्रभाग रचनेवरील आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.
महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धतीने नव्हे, तर वॉर्डरचनेनुसारच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली
गेल्या वेळी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा 113 वॉर्ड होते. त्यावेळी वॉर्डांची लोकसंख्या सरासरी 10 हजार एवढी होती. त्यानंतर सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट झाला. या भागाची लोकसंख्या 50 हजारांहून अधिक होती. मात्र, महापालिकेने 115 वॉर्डांचे बंधन असल्याने फक्त दोनच वॉर्ड तयार केले. संपूर्ण रचना नव्याने होणार असताना आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.
शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18
संबंधित बातम्या :
इजा बिजा तिजा! औरंगाबाद महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत