मुंबई : राज्यात अस्थिरतेचे ढग दाटलेले असतानाच आता महाविकास आघाडीतील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची कॅबिनेटची बैठक होत आहे. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेटची मिटिंग असल्याचंही सांगितलं जात आहे. या बैठकीत नामांतराचे तीन ठराव आणले जाणार आहेत. त्यापैकी दोन ठरावांना काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीकडून (ncp) कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. औरंगाबादचं संभाजी नगर नामांतर करणे आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणार आहे. त्यामुळे आजची कॅबिनेटची बैठक वादळी होण्याची शक्यात आहे. तर दुसरीकडे शिवसेना या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा पुढे करून सरकारमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे सरकारचा हा एक्झिट प्लॅन असल्याचंही बोललं जात आहे.
आज सायंकाळी 5 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचं आहे. त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे आजची कॅबिनेटची बैठक ठाकरे सरकारची शेवटची बैठक असेल असं सांगितलं जात आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करा आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही असणार आहे. काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही त्याबाबतचे सुतोवाच केले होते. मात्र, या नामांतराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीत काँग्रेसकडून शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाचा हवाला दिला जाणार आहे. किमान समान कार्यक्रमावर आधारीत महाविकास आघाडी तयार झाली होती. त्यात नामांतराचा विषय कोणताच नव्हता. शिवाय धार्मिक आणि वादग्रस्त विषयांना हात न घालण्याचं या बैठकीत ठरलं होतं. तसेच धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर हे सरकार चालवण्याचंही किमान समान कार्यक्रमात ठरलं होतं. त्याचाच दाखल काँग्रेसकडून शिवसेनेला दाखवला जाऊ शकतो. त्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
ठाकरे सरकार अल्पमतात आहे. उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठीची परीक्षा आहे. त्यापूर्वीच नामांतराचा मुद्दा शिवसेनेकडून पुढे केला जात आहे. आघाडी सरकारकडून एक स्क्रिप्ट तयार केली आहे. त्यानुसार शिवसेनेने नामांतराचा प्रस्ताव आणायाचा. काँग्रेसने त्याला विरोध करायचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सरकारबाहेर पडायचं असं या सरकारचं ठरलं आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवसेनेचा हा एक्झिटचा प्लॅन आहे. त्यासाठीच हा प्रस्ताव जाणीवपूर्वक ठेवला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.