मुंबईः महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपच्या युती सरकारमधील पहिल्या टप्प्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची नाराजी वारंवार दिसून येतेय. औरंगाबादेत काल झालेल्या कार्यक्रमातदेखील संजय शिरसाट यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर आली. नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या अतुल सावे (Atul Save)यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, जे राजकारणात येतील असं वाटलंही नव्हतं पण आज कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत पोहोचले, असा टोमणाही संजय शिरसाट यांनी लगावला. औरंगाबादेतील एकनाथ शिंदे यांच्या गटात पाच आमदार गेले आहेत. या शिवसेना आमदारांना बंडात शामिल करून घेण्यासाठी संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही ऐनवेळी त्यांच्या वाट्याला मंत्रिपद न आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद पश्टिम मतदारसंघातील रोपळेकर चौक ते जवाहर पोलीस स्टेशन, आकाशवणी चौक-त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर, देवानगरी ते प्रताप नगर तसेच पडेगाव ते स्लाटर हाऊस या रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रविवारी या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आमदार संजय शिरसाट, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत रोपळेकर चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी संजय शिरसाट यांनी अतुल सावेंच्या मंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘ अतुल सावेंचंच पहा. त्यांच्या वडिलांसोबत मी स्वतः काम केलंय. पण अतुल सावे राजकारणात येतील असं काही वाटलं नव्हतं.. पण तो आला काय.. राज्यमंत्री आणि त्यांनतर कॅबिनेट मंत्री झाला काय, इथे शिंदे गटाचं काहीच राहिलंच नाही.. असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं.
औरंगाबादेतील या कार्यक्रमात भाजपला उद्देशून संजय शिरसाट म्हणाले, मला इथे भाजप शिवसेना एकत्र दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीतही एकत्रच रहावे. उगाच माझ्याविरोधात कुणी उभे करू नका. आपल्याला मिळून दुसऱ्यांविरोधात लढायचंय, हे लक्षात ठेवा…
माझ्याविरोधात कुणाला उभं करू नका, या शिरसाटांच्या विनंतीला अतुल सावेंनीही उत्तर दिलं. तुम्हाला इथे कोणताही त्रास होणार नाही, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. या कार्यक्रमाला स्मार्ट सिटी आणि महानगर पालिकेतील प्रमुख अधिकारी मात्र गैरहजर होते. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह मनपा अधिकाऱ्यांची गैरहजेरी हा चर्चेतला मुद्दा ठरला.