मुंबई : (Shiv Sena) शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेनंतर पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे हे नेमके काय बोलणार याकडे सर्व देशाचे लागले होते. आतापर्यंत शिवसैनिकांशी संवाद साधताना किंवा सोशल मिडियातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या तरी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. केवळ आपले म्हणणे मांडायचे आणि प्रश्नांना बगल हा जणू ट्रेंडच सुरु झाला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधानही आपली भूमिका मांडूनच काढता पाय घेतात. त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांना नेमकी कशाची भीती वाटते हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. राज्यात महिनाभर राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर पक्षप्रमुख माध्यमांसमोर आले पण ते ही (Samana) ‘सामना’तून. त्यामुळे मुलाखतीमध्ये जो सामना असतो तो पाहवयास मिळालाच नाही. यामध्ये आपलाच बॉल..आपली बॅट… आणि पिचही आपले असल्याने बॅटींगही आपलीच. असाच तो सामना झाल्याची चर्चा आता सोशल मिडियामध्ये रंगू लागली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सामनाला मुलाखत देणार हे गेल्या काही दिवसांपूर्वीच ठरले होते. त्याअनुशंगाने टीझर आले. मात्र, सामनाला मुलाखत म्हणजे सर्वकाही ठरवून अशीच एक भावना सर्वसामान्यांची झाली आहे. गेला महिनाभर बंडखोर आमदारांबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी जी भावना व्यक्त केली तीच मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते आता कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणापर्यंतचा प्रवास पक्षप्रमुखांनी सांगितला असला तरी जनतेच्या मनातील तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना पक्ष, बंडखोर आमदार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवतीच मुलाखत ही पिंगा घालत होती. तेच प्रश्न आणि तीच उत्तरे असेच काय ते मुलाखतीचे स्वरुप राहिले आहे.
हिंदुत्व आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत नको असलेली युती या दोन मुद्यांवरच बंडखोर आमदारांनी बोट ठेऊन आपण ही भूमिका घेतल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेसबाबत युती तोडण्याच्या नेमक्या काय अडचणी होत्या याचा देखील उहापोह होणे गरजेचे होते. इतर वेळी आक्रमकपणे भूमिका मांडणारे संजय राऊतही त्यांच्याच कलानुसार प्रश्नांचा भडिमार करीत होते. त्यामुळे केवळ बंडखोरांवर हल्लाबोल आणि भाजपानेच हे सर्व घडून आणले ही केवळ एक बाजू समोर आली आहे. शिवाय यानंतर पक्षाची भूमिका काय राहणार? पक्ष नव्या उमेदीने वाढण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार? याची उत्सुकता प्रत्येकाला होती पण तसे झाले नाही.
संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दीर्घ अशी मुलाखत घेतली असली तरी यामधून नेमके साध्य काय होणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. भाजपाने पाठीत वार केला, बंडखोरांची राक्षसी भूमिका हे मुद्दे यापूर्वीच जनतेसमोर आले आहेत. पण बंडखोर आमदारांनी आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली होती का? 50 आमदार हे टोकाची भूमिका घेत असताना आपण कोणालाच कसे रोखू शकले नाहीत असे एक ना अनेक प्रश्न सर्वासामान्यांच्या मनात घर करुन आहे. शिवाय दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीन प्रश्न विचारले आहेत.यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का ? एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्रीपद नको हे पद तुमच्याकडेच राहू द्या..फक्त राष्ट्रवादी-कॉंग्रेसबरोबर युती करु नका असे म्हणाले होते का? आणि तिसरा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला आहे की, राहुल शेवाळे असे म्हणाले होते की, पक्षप्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले आणि तेव्हापासूनच चर्चा ही फिस्कटली असे तीन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी प्रश्नाचे उत्तर न आल्याने हे सर्व खरे होते की काय अशी शंका आता निर्माण होत आहे.