मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा काल विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. या विस्तारात ठाकरे सरकारमधील माजी मंत्र्यांचा समावेश करून घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं झालं नाही. माजी मंत्र्यांपैकी मोजक्याच मंत्र्यांना कालच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. तसेच अपक्षांनाही वेटिंगवर ठेवण्यात आलं. बच्चू कडू हे बंड झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत होते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि महत्त्वाचं खातं मिळेल, असं सर्वांना वाटत होतं. खुद्द बच्चू कडू यांनाही शिंदे यांच्याकडून मोठी बक्षिसी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिंदे यांनी बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारातून तांदळातील खड्यासारखे बाजूला केल्याने बच्चू कडू अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मलाईदार खातं नाही, कॅबिनेटही नाही अन् राज्यमंत्रीपदही न मिळाल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था बच्चू कडू यांची झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं तेव्हा बच्चू कडू यांनी शिंदे यांना सुरुवातीपासून साथ दिली. आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडत बच्चू कडू हे शिंदे यांच्यासोबत सुरत ते गुवाहाटी असा प्रवास करत राहिले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी युती केल्याने शिंदे-भाजप युतीचं राज्यात सरकार येईल अशी शक्यता बळावली. त्यामुळे आपल्यालाही चांगलं मंत्रिपद मिळेल असं अनेक बंडखोर आमदारांना वाटत होतं. बच्चू कडू तर ठाकरे सरकारमध्ये राज्य मंत्री होते. त्यांना तर आपल्याला कॅबिनेटमंत्रीपद मिळेल असं वाटत होतं. बच्चू कडू यांनी तसं जाहीर बोलूनही दाखवलं होतं. मला शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. मात्र, काल प्रत्यक्षात झालेल्या विस्तारातून बच्चू कडू यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बच्चू कडू यांना सामाजिक न्याय आणि जलसंपदा सारखं मंत्रिपद हवं होतं. ही दोन्ही खाती भाजपकडे गेली आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांना ही दोन्ही मंत्रिपदे मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, दुसऱ्या विस्तारात बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपदच दिलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे. याची भनक बच्चू कडू यांनाही लागली आहे. त्यामुळे त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा बच्चू कडू या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते. ते विधान भवनातच होते. विधान भवनातील प्रहारच्या कार्यालयात ते त्यांच्या भागातील लोकांच्या विविध समस्यांचे पत्र तयार करत होते, असं सांगितलं जातं. यावरून बच्चू कडू किती नाराज आहेत, याची कल्पना येते, असं सूत्रांनी सांगितलं.
या विस्तारानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अपक्ष आणि मित्रपक्षामिळून सरकार बनलेले आहे. मित्रपक्षांना संधी द्यायला हवी होती. त्यांनी आम्हाला शब्द दिला की दुसऱ्या शपतविधीत मित्रपक्षांना स्थान देण्यात येईल, असं बच्चू कडू म्हणाले.