रवी राणा आणि बच्चू कडू यांना समोरासमोर बसून समजावलंच नाही; शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 31, 2022 | 5:45 PM

राणांच्या समोर बसून चर्चा करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बसलो नाही. त्यामुळे आम्हाला दोन्ही नेत्यांनी वेगवेगळं समजावलं.

रवी राणा आणि बच्चू कडू यांना समोरासमोर बसून समजावलंच नाही; शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: एकनाथ शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद मिटल्याचं सांगण्यात येत आहे. रवी राणा यांनी हा विषय संपला असल्याचं जाहीर केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनीही हा वाद संपल्याचं जाहीर केलं आहे. या दोन्ही आमदारांना समोरासमोर बसवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांची समजूत काढल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. स्वत: बच्चू कडू यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खुलासा केला. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांनी आम्हा दोघांशी चर्चा करून आमची समजूत काढली. पण राणा आणि माझी समोरासमोर भेट झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राणा यांना वेगळं समजावलं. तर मला वेगळं समजावलं. आम्ही दोघेही समोरासमोर नव्हतो, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

राणांच्या समोर बसून चर्चा करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बसलो नाही. त्यामुळे आम्हाला दोन्ही नेत्यांनी वेगवेगळं समजावलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद होऊ नये म्हणून दोन्ही आमदारांमध्ये आचारसंहिता ठरवण्यात आली आहे. त्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली. काय बोलावं आणि काय बोलू नये. तसेच एकमेकांबद्दल बोलावे की नाही याबाबत आमच्यात आचारसंहिता ठरली आहे. या आचारसंहितेनुसार पुढे सर्व काही घडावे ही अपेक्षा आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

राणांच्या मागे कुणाचा तरी हात आहे, असं मी म्हटलं नव्हतं. आता हात कुणाचा नाही. भाजपचा या मागे हात नाही हे स्पष्ट झालं आहे. आमच्या बैठकीत गरमागरमी झाली नाही. विषय काही एवढा मोठा नाही. पण चहा एवढा तर विषय गरम होणारच, असं सांगतानाच आमच्यातील संबंध सुधारले की नाही हे येणारा काळ ठरवेल. संबंध म्हणजे सोयरीक थोडीच आहे? असा सवालही त्यांनी केला.