मुंबई : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या मराठा आरक्षणाचे बाळासाहेब सराटे यांनी आता माळी, धनगर आणि वंजारी समाजाचं आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी लावून धरली आहे. बाळासाहेब सराटे यांनी याआधी इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणालाही विरोध करत, ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असून ते रद्द करावं, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात केली आहे. त्यावरील सुनावणी 4 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
“माधव (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युला हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे आणि त्यांनी 80 च्या दशकामध्ये या तीन जातींच्या नेतृत्त्वांना पुढे आणलं. त्यावेळी मराठा आरक्षण महाराष्ट्रात प्रस्थापित झालं होतं, त्याला शह देण्याचा प्रयत्न केला गेला. एक राजकीय खेळी म्हणून त्याला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाच्या विरोधात ते जात असेल, तर ते आमच्या दृष्टीने चिंतेजी बाब ठरते.”, असे बाळासाहेब सराटे म्हणाले.
तसेच, “महाराष्ट्रातील गेल्या 25 वर्षातील राजकीय परिस्थिती पाहिली, तर भाजपने मराठा समाजाच्या समोर माळी, धनगर, वंजारी या जातींना झुकतं माप देऊन, ओबीसीतील मूळ भटके-विमुक्त आणि बलुतेदार-अलुतेदार आहे, त्यांच्यावरही खूप अन्याय केलेला आहे.”, अशी टीका सराटे यांनी सरकारवर केली.
“ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे सरकार म्हणतंय, कारण माळी, धनगर, वंजारी या तीन जातींच्या आधारे त्यांचं राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलं आहे. मग जर या तीन जातींमुळे मराठा आरक्षणाला 52 टक्क्यांच्यावर ढकलून कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावलं जात असेल, तर आम्ही म्हणणारच की, हे सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मग आमची थेट मागणी आहे की, या तीन जाती (माळी, धनगर, वंजारी) या मागासलेल्या आहेत की नाही, ते आयोगाकडे पाठवून तपासणी करावी.” – बाळासाहेब सराटे, मराठा आरक्षणाचे अभ्यासक
बाळासाहेब सराटे यांनी आता माळी, धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाची फेरतपसणीची मागणी केली. माळी, धनगर आणि वंजारी हा समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येत आहे. त्यामुळे सराटे यांच्या मागणीचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यात, धनगर समाजाच्या आरक्षणावरुन आधीच वाद सुरु आहे. धनगड आणि धनगर या शब्दांतील फरकामुळे या समाजातील मोठा वर्ग आरक्षणापासून आधीच वंचित आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सराटे यांनी काय याचिका केलीय?
इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.
तसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.
कोण आहेत बाळासाहेब सराटे?