मुंबई : भाजपसोबत युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जाते. भाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्हि हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते आणि राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद : LIVE https://t.co/rsu9fOy1pr
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 23, 2022
‘मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
‘गुलाम म्हणून आम्ही राहण्याचं असलेलं तुमचं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान? आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली, उजेडात शपथ घेतली. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केलं. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही. काल परवा ज्या निवडणुका झाल्या, बँका, नगरपंचायती, विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, महाराष्ट्र सोडूनही आपण आता निवडणुका लढवायचा. खरं हिंदुत्व घेऊन आपण पुढे जाऊ. हरलो तरी खचायचं नाही. आणि जिंकलो तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. आता झालेल्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या’, असंही ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचं असं का होतं, असे अनेक लेख आले. जे काही निवडून आलेले शिवसेनेचे लोक आहे, त्यामानाचे आम्ही नंबर चार वर आहोत. आजपर्यंत नगरपंचायती निवडणुकांमध्ये युतीत लढलो होतो, त्यापेक्षा जास्त लोक आमचे निवडून आहेत आहेत. पण आपण जेवढ्या जिद्दीने विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढवतो, तेवढ्या जिद्दीनं निवडणुका लढवत नाही आहोत.. इतर पक्ष ज्या प्रमाणे छोट्या निवडणुका लढत आहेत, तसे आपण लढत नाही. याला मीही जबाबदार आहे. यापुढे आपण आता हे टाळलं पाहिजे. दोन विधानपरिषदा आपण हरलो. काही जण म्हणतात, आपल्यातच गद्दारी झाली. पण आता आपल्याच आईच दूध विकणारी औलाद आपल्यात नाही. असे कुणी असतील तर त्यांनी शिवसेना सोडावी, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील काहींना दिलाय.
इतर बातम्या :