मुंबई : औरंगाबाद शहराच्या नमांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवर सीएमओला सुनावलं आहे. “माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे (Balasaheb Thorat on CMO).
“महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे (Balasaheb Thorat on CMO).
“छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया”, असं आवाहन थोरात यांनी केलं.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
संबंधित बातमी :
औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
संबंधित व्हिडीओ :