मुंबई : “गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते अभिनेत्री कंगना रनौतच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करुन मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जनता कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे (Balasaheb Thorat on Kangana Ranaut).
“ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना रनौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आहे. हा महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसांचा अपमान आहे”, असा घणाघात बाळासाहेब थोरातांनी केला (Balasaheb Thorat on Kangana Ranaut).
“बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत”, असं टीकास्त्र बाळासाहेब थोरात यांनी सोडलं आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याआधी काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीदेखील कंगनाच्या मुंबई संबंधित टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. “कंगना रानौत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?”, असा प्रश्न मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवर विचारला होता.
कंगना रानावत म्हणते, “मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते”. अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला? https://t.co/suaMDvPdJk
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 3, 2020
कंगना नेमकं काय म्हणाली होती?
अभिनेत्री कंगना रनौतने ट्विटरवर संजय राऊत यांनी उघड धमकी दिल्याचा दावा केला होता. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”, असा सवाल कंगनाने केला होता.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटते, असं वक्तव्य करणाऱ्या कंगनाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनापाठोपाठ मनसेनेदेखील कंगनाच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. “दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे”, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
संबंधित बातम्या :
फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत