दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं. शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हा सर्वांना माहित असलेला इतिहास आहे. पण त्याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा प्रयत्न केला होता, असा आरोप महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेश म्हस्के हे ठाण्यातील सर्व प्रमुख नेते त्यांच्यासोबत होते, अपवाद फक्त राजन विचारेंचा. ते आजही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ठाण्यात त्यांचा सामना महायुतीच्या नरेश म्हस्के यांच्यासोबत आहे. येत्या 20 तारखेला मुंबई-ठाण्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आता हळूहळू इथलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘एकनाथ शिंदे हे 2013 सालीच फुटणार होते’, असा दावा राजन विचारे यांनी केलाय. “एकनाथ शिंदे 2013 सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. कुठल्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात? स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते” असा दावा राजन विचारे यांनी केला. “आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं” असं राजन विचारे म्हणाले.
‘फक्त सेटिंग करत राहिलात’
“एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा?” अशा शब्दात राजन विचारे यांनी हल्ला चढवला. काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राजन विचारे यांच्या आरोपांना दुजोरा दिला. “2013 साली एकनाथ शिंदे पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मी असं ऐकलं होतं” असं विजय वेडट्टीवार म्हणाले.