मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज विधानभवनावर धडकणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाने राज्याच्या विविध भागातून संवाद यात्रा सुरु केल्या आहेत. या संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने पोलिसांसह संपूर्ण प्रशासन व्यवस्था सतर्क झाली आहे. पोलिसांनी तर या संवाद यात्रेची एकप्रकारे मुस्कटदाबीच करण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी मराठा समाजाचे कार्यकर्ते, मोर्चाचे समन्वयक यांची धरपकड सुरु केली आहे.
आज मुंबईत येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक व कार्यकर्त्यांची पोलिसांनी काल रात्रीपासूनच धरपकड सुरु केली आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे व मुंबईत पोलिसांनी समन्वयकांना स्थानबद्ध केल्याची माहिती राज्यभरात पसरत आहे. आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली असतानाही राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत, यासाठी पोलिसांचा ससेमिरा सुरु आहे.
मराठा नेते – अटक, पाळत, स्थानबद्ध
आज पहाटे दादरमधून माऊली पवार, संजीव भोर व अंकुश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेत माटुंगा पोलिस स्टेशनला नेले आहे. ठाण्याचे समन्वयक इंद्रजित निंबाळकर यांच्या घराबाहेरच पोलिसांनी पाळत ठेवली असून पोलिस स्टेशनला येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. कोल्हापुरात दहा समन्वयकांना ताब्यात घेतल्याने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर नाशिकमध्येही मराठा समाजात पोलिस कारवाईमुळे संतापाचे वातावरण आहे.
दसरा चौकाला पोलिस छावणीचं रुप
कोल्हापुरातील दसरा चौकाला पोलिस छावणीचं रुप आलं आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल मराठा कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने शहरात तणाव होता.
संबंधित बातम्या :
मराठा क्रांती ठोक मोर्चाने बीडमध्ये पुन्हा उपोषणास्त्र उगारलं!
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर अटकेत
मराठा आरक्षणावर सरकारकडून सरळ सरळ फसवणूक : शरद पवार
ओबीसी वि. मराठा चर्चा, मुख्यमंत्र्यांसमोर खुद्द छगन भुजबळ
मराठा आरक्षणावर हे तीन संभ्रम अजूनही कायम
या सात मंत्र्यांची समिती मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करणार!
मराठा आमदारांना सोडणार नाही, मराठा मोर्चाची धमकी
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन