मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, राज्यपाल कोश्यारी यांच्या 5 तारखेच्या नांदेड दौऱ्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली आणि राज्याच्या मुख्य सचिवांना त्याबाबत राजभवनाला कळवण्यासही सांगण्यात आलं आहे. तशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. त्यावर आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. (Praveen Darekar and Ashish Shelar respond to Nawab Malik’s criticism of Governor)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळं पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही, असा खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केलीय. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, म्हणजे नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!मा. @nawabmalikncp जी
त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या!
नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 3, 2021
दुसरीकडे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मलिकांवर टीका केलीय. मलिक हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. सरकार काम करत नसल्यानं राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहूनच काम करत आहेत. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज जेव्हा जनतेपर्यंत पोहोचेल तेव्हा खरं. तातडीची मदत अजूनही मिळाली नाही तर पॅकेजचं काय? असा सवालही शेलार यांनी विचारलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5 ऑगस्ट रोजी नांदेड दौरा होणार आहे. या दौऱ्यात नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील दोन वसतीगृहांचं उद्घाटन करणार आहेत. मात्र, ही वसतीगृह राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून बांधण्यात आली आहेत. हॉस्टेल बांधण्यासाठी निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यांनी ही वसतीगृह विद्यापीठाला अद्याप वर्ग करण्यात आलेली नाहीत. मात्र, राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारला न कळवता या वसतीगृहांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. हिंगोली आणि परभणीमध्येही ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, है गैर असल्याचं मदत मलिक यांनी व्यक्त केलंय.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत चर्चा झालीय. विद्यापीठातील कार्यक्रमावर आक्षेप नाही. मात्र, उद्घाटन आणि प्रशासनासोबतच्या बैठकींवर राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठका म्हणजे राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसंच राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतील. राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात हे समजून घ्या; नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला
राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
Praveen Darekar and Ashish Shelar respond to Nawab Malik’s criticism of Governor