पुणे | 4 डिसेंबर 2023 : “महादेवा मला मंत्री करा, सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी”, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. हडपसर हांडेवाडी रोड श्रीरामाचा पूर्णाकृती मूर्तीच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे भरत गोगावलेंनी इच्छा व्यक्त केली. “अजून मंत्री झालो नाही. पण आता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी आशा आहे. येथील महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरणही होणार आहे. त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा. सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी”, असं म्हणत गोगावलेंनी महादेवाकडे मंत्रीपदासाठी साकडं घातलं आहे.
“जसं आम्ही शिल्प आणण्यासाठी पायरी-पायरी चढून मंत्रालयापर्यंत गेलो. त्याच पद्धतीने हे नाव बदलण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. त्याची सुरुवात आम्ही मंडळींनी केलेली आहे. करायचं ना महादेववाडी? मग महादेवाला आता आमचा नमस्कार सांगा की, भरत शेठला मंत्री करा म्हणून”, असं भरत गोगावले आपल्या भाषणात म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होणार? हा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना आपल्यासोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे स्वत: या नव्या सरकारचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या गोटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाची पहिल्या दिवसापासून आशा होती. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांची इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामध्ये भरत गोगावले यांचादेखील समावेश आहे.
भरत गोगावले यांनी यापूर्वीदेखील अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यावर आल्याची माहिती समोर आली होती. मंत्रिमंडळाचा शंभर टक्के विस्तार होईल, असं सांगितलं जातं होतं. पण अचानक ऐनवेळी राजकारणातले फासे पलटले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांच्या भल्यामोठा गटासह पक्षात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नवे मंत्री बनले. पण शिवसेनेच्या आमदारांसाठी होणारा विस्तार झाला नाही. भरत गोगावले यांनी आता पुन्हा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने राजकारणात अजून बरंच काही घडायचं राहिलं आहे, असे संकेत मिळत आहेत.