‘तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो’, असं म्हणत आमच्याच एका आमदाराने धमकी दिली, त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. तसेच या आमदाराने माझी बायको आत्महत्या करेल, असा दावाही केला होता, असंही भरतशेठ यांनी सांगितलं. अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने ‘तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो’, असं म्हटलं. त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असं आमदार भरत गोगावले म्हणाले.
सिडकोचे अध्यक्ष झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर यावेळी गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला. तर मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं, मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे. ‘एक आमदार तर म्हणाले की, मला मंत्रिपद मिळालं नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल, मग आमच्या बायकांनी काय करावं?’ असासवाल भरत गोगावले यांनी केला.
त्या आमदारासाठी आम्ही मंत्रीपद सोडलं. कारण कुणाचं घरदार उद्ध्वस्त व्हायला नको, असंही भरत गोगावले म्हणाले. गोगावले हे अंबरनाथमध्ये शिवसेनेना आयोजित महाड, पोलादपूर, माणगाववासियांच्या संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
मी खुर्चीवर बसलेलो तुम्हाला आवडत नाही का? आमच्यात कुठलीच नाराजी नाही. काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काम करू. आधी मी देखील संभ्रमात होतो. 20 दिवसांसाठी पद मिळालं असेल तर का घ्यावं? यावर विचार करत होतो. पण आज मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्यांनी सांगितलंय की तुमचा विचार केला जाणार त्यासाठी आता मी हे पद घेतलंय. मंत्री होणार आणि मगच कोट घालणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.