मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. (Bhaskar Jadhav objection to BJP Prati Vidhansabha showing rules said Seize speaker)
विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.
विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी भास्कर जाधव उभे राहिले. यावेळी त्यांनी तीन मुद्दे मांडले. संसदीय कार्यमंत्र्यांना बोलावून पायऱ्यांवर गदारोळ करणाऱ्यांना भाजप सदस्यांना विधानसभेत बोलवा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच बेकायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या भाजप आमदारांचा स्पीकर जप्त करा, प्रतिविधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पाहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, असं ते म्हणाले. तसंच कोरोनामुळे शासनाने अधिवेशनावेळी इतके कडक निर्बंध लावलेले असताना माजी आमदार भाजपच्या प्रति विधानसभेत कसे, असे सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.
12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी घेतला. विधानसभेत किंवा विधान परिषदेत न जाता विधिमंडळाच्या पायर्यांवर बसूनच भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रति विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपाचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आलं. तसंच पहिल्यांदा बोलण्याची संधी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली. विखे पाटलांनी विविध मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी दोन माईक लावून भाजपचं हे सगळं आंदोलन सुरु होतं. याच आंदोलनावर भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांच्या परवानगीशिवाय भाजप आंदोलन करुच कसं शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(Bhaskar Jadhav objection to BJP Prati Vidhansabha showing rules said Seize speaker)
हे ही वाचा :
VIDEO: विरोधकांची विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा, सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला