सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात दोन मातब्बर नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कुस्ती पाहायला मिळणार आहे. शशिकांत शिंदे हे जेष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याचे आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या मतदारसंघात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे या पराभवानंतर सुद्धा शशिकांत शिंदे यांना अनेक संधी शरद पवार यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. विधानसभा मतदारसंघात मागील पंचवार्षिक निवडणुकीत महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात झालेली तुल्यबळ लढत यावेळी पुन्हा पहायला मिळणार आहे. पण मागील पाच वर्षात मतदारसंघांमध्ये बराच मोठा राजकीय बदल झाला आहे. महेश शिंदे यांची शिवसेना आणि शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे दोन गट झाले आहेत. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांत महेश शिंदे यांनी चांगलीच आघाडी घेतली. तर त्या तुलनेत शशिकांत शिंदे यांचा लोकांशी असणाऱ्या संपर्कामध्ये शशिकांत शिंदे मागे पडल्याचे बोलले जात आहे.
याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला महेश शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील जागावाटपातील तडजोडीनुसार त्यांना शिवसेनेचे शिवबंधन बांधून धनुष्यबाण या चिन्हावर लढावे लागले. त्यांच्या विरोधात कोरेगावातून दोन वेळ आमदार आणि त्यामध्ये दीड वर्षे जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालक मंत्रीपद भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे तिसऱ्या वेळी आपले नशीब आजमवत होते. दोन्ही नेत्यांमध्ये त्यावेळी जोरदार संघर्ष झाला होता. आणि त्यावेळेस झालेल्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव करत राजकीय पाटलावर जोरदार धक्का दिला होता. शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाल्यामुळे हा पराभव राष्ट्रवादीचे ज्यष्ठ नेतेश शरद पवार यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी शशिकांत शिंदे यांना लगेचच विधान परिषद दिली होती.
सत्तेत आल्यानंतर सुमारे अडीच वर्षात महेश शिंदे यांनी शब्दशः कोट्यवधींचा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणत गावोगावी काँक्रिट रस्ते, बंदिस्त गटारे, स्वतःच्या आमदार मानधनातून शेकडो किलोमीटर पाणंद रस्ते आदी विकासकामे उभी केली. कोरेगाव शहरात तीनशे कोटींवर निधी आणला. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू शेकडो रुग्णांना निधी मिळवून दिलासा दिला. जिहे कठापुर योजनेसाठी निधीची तरतूद करून घेतली. नेर तलावात पाणी पोचवले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मंजुरी मिळवून मतदारसंघातील दुष्काळी भागाच्या सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी अतिरिक्त मिळवले. विकासकामे करताना गाव, वाडी, वस्तीमध्ये त्यांनी आपला मजबूत गटही निर्माण केला आहे. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत.
निसटत्या पराभवानंतर विधान परिषद सदस्य तथा आमदारकी मिळूनही शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षात आघाडीतील घटक पक्षांतील रस्सीखेचीमध्ये मोठा निधी मिळवण्यात अडचणी आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट झाल्यानंतर सुद्धा शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्याबरोबर न जाता उलट शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खासदार उदयनराजे यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी मैदानात उतरवले होते. परंतु या निवडणुकीत सुद्धा शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला.
सध्याची या मतदारसंघांमध्ये परिस्थिती पाहता महेश शिंदे यांच्या बाजूने या मतदारसंघाचे झुकते माप जरी असले तरी या मतदारसंघात शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांचा मोठा प्रभाव असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. शशिकांत शिंदे यांना जरी ही निवडणूक अवघड वाटत असली तरी शरद पवार नावाचे एक मोठे शस्त्र आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तर दुसरीकडे महेश शिंदे हे कोरोना काळापासून लोकांच्या सेवेत असल्याने ती त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळेच सध्या या मतदारसंघांमध्ये महेश शिंदे यांची सरशी जरी जाणवत असली तरी शरद पवार हे या मतदारसंघांमध्ये शशिकांत शिंदेंसाठी काय जादू करणार? हे आता पहावे लागेल.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल असे वातावरण सध्या विधानसभा निवडणुकीत आहे आणि निश्चितच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार सुद्धा मीच होणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी ठरवले तर मी मंत्री पण होईन. मी पाकिस्तानचा मंत्री नाही पण ब्राझीलला जाणारे कोण आहेत हे सर्वांना माहित आहे. माझ्या मते लोकांना सर्व समजत आहे, कोण प्रतिनिधी चांगला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्र लुटला गेला आहे. गद्दारी केली आहे. मला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक सर्व लक्षात ठेवून आहे. निकाल चांगला लागेल”, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिलीय.
“जे प्रतिनिधी मागील 25 वर्षापासून या भागामध्ये नेतृत्व करत होते त्यांना एक फुटाचा विकास करता आला नाही. मात्र मागील अडीच वर्षात जो विकास होतोय तो तुम्ही गावागावात पाहत आहात. ज्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राला लुटलं अशा लोकांनी दडपशाहीची भाषा करणे ही शोकांतिका आहे आणि हास्यास्पद गोष्ट आहे. आज आमच्यावर समोरचा आमदार गुंडगिरी आणि नैतिकतेवर बोलतो हाच आमचा विजय आहे. एकट्याला पराभूत होत नाही म्हणून माझ्या नावाचे तीन-तीन उमेदवार उभे केले आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. यांची चौघांची मोळी बांधून आम्ही वाशीला पाठवणार”, अशी जोरदार टीका शशिकांत शिंदे यांच्यावर महेश शिंदे यांनी केली आहे.
कोरेगाव विधानसभा निवडणुकीत अतिशय तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळणार आहे. मागील वेळी राष्ट्रवादीमध्ये असणारे शशिकांत शिंदे यांचा सहा ते साडेसहा हजाराच्या दरम्यान पराभव झाला होता. त्यावेळची परिस्थिती आणि या वेळेच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. त्यावेळी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांनी दिलेले पाठबळ महेश शिंदेंना विजयाकडे घेऊन गेले. 18 गावांमध्ये शशिकांत शिंदे यांना मानणारा वर्ग पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने महेश शिंदे यांनी विकासकामांचा महापूर आणला याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो. अगदी सामान्य व्यक्तीचं काम जरी असेल तरी महेश शिंदे हे स्वतः फोन करून मार्गी लावत आहेत. यामुळे या दोघांमध्ये तुल्यबळ फाईट होईल.