मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरुन सध्या चर्चेचं वादळ उठलंय. अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असे दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. असं असताना, राष्ट्रवादीच्या 2 आमदारांनी अजित पवारांना पाठींबा दिलाय. पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे उघडपणे समर्थन देण्यास पुढे आले आहेत. बनसोडेंनी अजित पवारांची भेटही घेतलीय. अजित पवारांनी कोणताही निर्णय घेतल्यास अजित पवारांसोबत असल्याचं आमदार बनसोडे आणि माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
दुसरीकडे भाजपच्या गोटात हालचाली वाढल्यात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार दिल्लीत आले. अजित पवार आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या स्थितीवरुन भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दिल्लीला रवाना होण्याआधी, अजित दादांच्या प्रश्नावर त्यांनी पक्षात स्वागत असल्याचं म्हटलंय. तर इकडे अजित पवारांनी, आपले कार्यक्रम रद्द केल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. पुरंदर तालुक्यातले 2 कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं.
अजित पवार पुरंदर तालुक्यातील शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. पुरंदरच्या वडकीत अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं. मात्र खारघरच्या उष्माघाताच्या घटनेमुळं MGM हॉस्पिटलला भेट दिल्यानं, परतण्यास उशीर झाल्यामुळं कार्यक्रम रद्द केल्याचं अजित पवारांचं म्हणणंय. अजित पवारांवरुन गेल्या काही दिवसांपासूनच, घडामोडी वाढल्यात.
7 एप्रिलला अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले होते. याच दिवशी अजित पवार चार्टड विमानानं दिल्लीला अमित शाहांना भेटल्याची बातमी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिली. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं ‘शिंदे गोईंग गोईंग’ अशी बातमी छापली. मात्र अजित पवारांनी आपण शाहांना भेटलोच नाही असं म्हणत बातमीतला दावा फेटाळला. त्यानंतर 11 एप्रिलला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले. इथं ठाकरे-पवारांमध्ये सव्वा तास चर्चा झाली.
12 एप्रिलला संजय राऊतांनी गौप्यस्फोट केला. भाजपचा दबाव असल्याचा आरोप असून, आपण पक्ष म्हणून भाजप सोबत जाणार नाही. कोणाला वैयक्तिक निर्णय घ्याचचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं पवारांनी सांगितल्याचं राऊत म्हणालेत.
12 एप्रिललाच सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अजित दादा भाजपसोबत जाणार असा दावा अंजली दमानियांनी केला. 16 एप्रिलला ‘सामना’तून संजय राऊतांनी फोडाफोडी सुरु झाल्याचे संकेत दिलेत. लोकशाहीची धुळधाण, फोडाफोडीचा सिझन 2 असं राऊतांनी म्हटलंय. 16 एप्रिललाच नागपुरात मविआची सभा झाली, त्यासभेत अजित पवारांनी भाषण केलं नाही. दोघेच बोलणार असल्यानं भाषण करणार नसल्याचं दादांनी स्पष्ट केलं.
अजित पवार भाजपसोबत आल्यास स्वागत असल्याचं भाजप म्हणते. तर शिंदेंची शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनीही दादांच्या स्वागताचीच भाषा केलीय. शंभूराज देसाई स्वागताची भाषा करत असले तरी त्यांच्याच पक्षाचे आमदार संजय शिरसाटांचा अजित दादांना विरोध आहे. आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहणार नाही, असं शिरसाट म्हणतायत.
2019मध्ये निकालानंतर मविआची निर्मिती सुरु असताना अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता. आता सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही अपेक्षित असताना, अजित पवारांवरुन चर्चा सुरु झाल्यात. अजित पवारांना खरंच भाजपसोबत जायचं असेल तर, तेवढं पक्षातील बहुमत दादांसोबत असं आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 2 तृतियांश म्हणजे 36 आमदारांचा पाठींबा अजित पवारांना गरजेचा आहे. आता एवढे आमदार दादांसोबत असतील का? आणि खरंच अजित दादांना भाजपसोबच जायचंच आहे का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.