तब्बल साडे चार तास भाजपची खलबतं, पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला धारेवर धरणार

| Updated on: Jun 08, 2021 | 9:01 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याबाबत चर्चा झाली.

तब्बल साडे चार तास भाजपची खलबतं, पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला धारेवर धरणार
devendra fadnavis
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजधानी दिल्लीतील गाठीभेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याबाबत चर्चा झाली. तशी माहिती आमदार आशिष शेलार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. (BJP core committee meets for 4 hours, decides to target Thackeray government)

आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या संघटनात्मक विकासाची गती, प्रगती आणि विस्तार याबाबत चर्चा झाली. सर्व स्तरावरील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी या बैठकीत कार्यक्रम आखण्यात आला. तसंच मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा याबाबत महाविकास आघाडी सरकार कसं जबाबदार आहे, याबाबत विस्तृत चर्चा झाली. या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं शेलार आणि बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकार मदत करत आहे. ही मदत जनतेपर्यंत पोहोचवणार आणि महानगरपालिका निवणुकीची रणनितीही आजच्या कोअर कमिटी बैठकीत ठरल्याचं शेलार यांनी सांगितलं.

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?

  1. राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा
  2. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर खल
  3. पक्षवाढीत्या दृष्टीकोनातून राज्याचा आढावा
  4. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका
  5. महापालिका निवडणुकीतील भाजपची स्थिती

कोअर कमिटीच्या बैठकीला कोणते नेते उपस्थित?

  • राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
  • आशिष शेलार
  • गिरीश महाजन
  • संजय कुटे
  • पंकजा मुंडे
  • मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा
  • चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे-मोदी भेटीवर फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. राज्याने जर केंद्राशी समन्वय ठेवला तर राज्याचा फायदा होतो. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं हे चांगलं नाही. आज ते पंतप्रधानांना भेटले ही चांगली गोष्ट आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतली की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी जेव्हा डेलिगेशन घेऊन जायचो तेव्हा 5 ते 10 मिनिटे ते डेलिगेशनशी चर्चा करतात आणि मग मुख्यमंत्र्यांशी 5 ते 10 मिनिटे वेगळी चर्चा करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांची वेगळी भेट झाली असेल तर त्याच आश्चर्य वाटण्यासारखं काही नसल्याचं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

ठाकरे- मोदी वैयक्तिक भेटीवर 5 तासांनी अशोक चव्हाण बोलले, म्हणाले…

चर्चा तर होणारच! पंतप्रधानांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं- संजय राऊत

BJP core committee meets for 4 hours, decides to target Thackeray government