वसई : पालघर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपच्या या मागणीचे कारणही अजब आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची निवडणूक निशाणी ‘आटो रिक्षा’ आहे.
मतदानाच्या दिवशी बहुजन विकास आघाडी शहरातील रिक्षाचा पूर्णपणे वापर करणार असून, रस्त्यावरुन फिरणाऱ्या रिक्षा मतदारांना प्रभावित करुन आचारसंहितेचा भंग करतील. त्यामुळे मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद ठेवाव्या, अशी मागणी भाजपाने केली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी एका निवेदनाद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पालघरमध्ये मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारीही विचारात पडले आहेत. वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी मात्र या मागणीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान
पालघरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.