प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यावरुन सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. प्रशांत किशोर राजकीय व्यवस्थापनात कुशल मानले जातात. जनमानसाची नाडी ओळखण्याचा गुण त्यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक राजकीय पक्षांनी त्यांची सेवा घेतली. देशातील वेगवेगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला असला, तरी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने बिहारच भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही. बिहारच्या मागासलेपणासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरलय.
माधेपुरामध्ये मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजपाला टोले लगावले. बिहारच्या भवितव्याचा विचार न करता नितीश कुमार यांच्या हाती राज्य सोपवल्याबद्दल प्रशांत किशोर यांनी टीका केली. “विविध पक्ष फोडून भाजपाने अन्य राज्यात सरकार बनवलं. पण 2020 विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारच भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ‘फक्त 42 आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवलं’ असं प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांचा आरोप काय?
“नितीश कुमारांवर खूप प्रेम आहे, म्हणून भाजपाने असं केलं नाही. बिहारमधून 30-35 खासदार निवडून आणण्यासाठी त्यांना नितीश कुमारांबरोबरच समीकरण कायम ठेवयाचय म्हणून भाजपाने हे केलं” असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. ‘बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाहीय’ असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.
भाजपाने काय उत्तर दिलं?
बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर यांचे हे सर्व आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच त्यांनी म्हटलं आहे. ‘भाजपाने जे काही केलं, ते राज्याच हित डोळ्यासमोर ठेऊन केलं’ असं भाजपा प्रवक्ते मनोज शर्मा म्हणाले. “पीकेला 2005 आधीची बिहारची स्थिती माहित नाही. जेडीयू आणि आम्ही दोघांनी मिळून बिहारची RJD च्या जंगलराजमधून सुटका केली. राज्य आणि पक्षाच हित डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने नितीश कुमार यांची मदत घेतली” असं मनोज शर्मा म्हणाले.