लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. या निवडणुकीत भाजपचं चुकलं कुठं? यावर चर्चा होणार असून मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात काही फेरबदल करण्याचाही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदी ठेवायचं की नाही? यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीत जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेतला जाणार आहे. पराभवाची कारणं विचारली जाणार असून काय केलं पाहिजे? याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार असून भाजप आणि महायुतीने कोणते कार्यक्रम राबवायचे हे ठरवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भाजपच्या आजच्या बैठकीत दोन मोठे निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे भाजपमध्ये फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नव्या चेहऱ्यांना आणि मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बैठकीतील या दोन महत्त्वाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांची पुण्याच्या मोतीबागेत बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर मंथन करण्यात आलं. या बैठकीनंतर आता आरएसएस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा बैठक होणार आहे. पुढील तीन महिन्यात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीतीवर चर्चा होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जंयती सोहळा यंदा राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे कालच्या बैठकीत ठरण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काल नांदेडमध्येही भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत मोठ्या प्रमाणावर असंतोष उफाळून आल्याचं दिसून आलं. माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित सभागृहात गोंधळ झाला होता. भाजपाच्या महानगर अध्यक्षाच्या विरोधात यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे भाषणाला उभे राहिले होते. त्यावेळी लोकसभेत काम केलं नाही, स्टेजवर बोलू नये, असं पदाधिकाऱ्यांनी महानगर अध्यक्षांना सुनावताच एकच गोंधळ निर्माण झाला. कंदकुर्ते यांनी लोकसभा निवडणुकीत संघटनात्मक काम न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.