मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार हे माफिया सरकार आहे. सरकारमधील एक एक भ्रष्टाचार उघडा पाडू, असा इशारा देणाऱ्या किरीट सोमय्यांची सध्याची प्रतिक्रिया काय आहे, याबाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. ठाकरे सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलेल्या तक्रारी मागे घेतल्या जाणार का, हा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. भाजप खासदार सोमय्या यांनी या प्रश्नांचं आज स्पष्टच उत्तर दिलं. सरकार बदललं तरीही माझ्या तक्रारी मी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब (Anil Parab) यांचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाणारच असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेऊन शिंदे यांचं अभिनंदन केलं.
महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा मागील अडीच वर्षांपासून आमचा संघर्ष होता. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने तो पूर्ण झाला. याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. एकनाथांना मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पाहून मला आनंद झाला. मात्र अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातील पुढील कारवाई सुरु ठेवावी, अशी विनंती मी त्यांना केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतरही परब यांच्याविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी, अशी विनंती सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ते म्हणाले, ‘
अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. तोडण्याचे आदेश 31 जानेवारीला दिले आहेत. स्वतःला पर्यावरणवादी म्हणणाऱ्या ठाकरेंनी ते बेकायदेशीरपणे थांबवलं. तो रिसॉर्ट ताबडतोब थांबवण्याची कारवाई पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु करावी, अशी विनंती मी केली आहे. अनिल परबनी बेनामी पद्धतीने रिसॉर्ट बनवला असेल तर पाडलाच पाहिजे, अशी भूमिका सोमय्यांनी मांडली.
एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन करतानाच किरीट सोमय्या यांनी आपण आधी केलेल्या तक्रारींपासून माघारी फिरणार नाही, असं ठामपणे सांगितलं. ते म्हणाले, ‘ एकिककडे माफिया मुख्यमंत्री आहे तर दुसरीकडे जनसामान्यांची सेवा करणारे रिक्षावाले मुख्यमंत्री आहेत. राऊत मशीन वॉसिंगमशीनवरून बोलायचे. महाराष्ट्राच्या जनतेनी उद्धव ठाकरेंची धुलाई केली. मुंबई हायकोर्टाने आणखी दोन तमाचे मारले. संजय राऊतांनी 15 पानी पत्र लिहिलं होतं. जे घोटाळे किरीट सोमय्याने बाहेर काढले आहेत. त्यातले कोणतेही घोटाळे सोमय्या मागे घेणार नाहीत. न्यायालयात जे खटले सुरु आहेत, तिथं कोर्याचा निर्णय मान्य केला जाईल.