मुंबई: भाजपने (bjp) वरळीत दीपोत्सवाचं आयोजन केलं आहे. त्यावर माजी पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेचा आशिष शेलार (ashish shelar) यांनी समाचार घेतला आहे. आम्ही वरळीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहेत. आमच्यावर टीका करणाऱ्यांना मुंबईकरांशी काही घेणंदेणं पडलेलं नाही. वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्विन आणि पार्टीशिवाय काहीच दिसत नाही, असा हल्ला आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता चढवला आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. आमची मुंबईकरांशी नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांना काय हवं आणि काय नको हे आम्हाला कळतं. पण काही लोकांना मुंबईकरांशी काही घेणंदेणं नाही. वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्विन आणि पार्टीशिवाय काही दिसत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
तसेच त्यांनी वरळीत एक तरी मराठी साहित्य, संस्कृती आणि लोककलेबाबतचा एखादा कार्यक्रम घेतल्याचं दाखवा, असं आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं.
ते घरात झोपून राहतात. ते घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? असा सवाल करतानाच आदित्य ठाकरे यांचा अभ्यास कच्चा आहे. ते आता वरळीत आलेत. यापूर्वी वरळीत दत्तात्रय राणे आमदार होते, हे त्यांना माहीत नसावे, असा चिमटाही त्यांनी काढला.
उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या विषयावर मी भाष्य करणार नाही, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे त्यांचेच शेजारी आहेत. शिवाय मराठी व्यक्ती आहे. उद्धव ठाकरेंविरोधात शेजाऱ्यांनीच याचिका दाखल केल्याने हा एक प्रकारे मुंबईकर आणि मराठी माणसाने केलेला उठावच आहे, असा दावाही त्यांनी केला.