मुंबई | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकाल आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहेत. तर तेलंगणा राज्यात काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीला महत्त्व मानलं जातंय. लोकसभा निवडणुकीआधी ही सेमीफायनल असल्याचं मानलं जात होतं. आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपला देशातील तीन राज्यांमध्ये मोठं यश मिळताना दिसत आहे. या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तीन राज्यातील भाजपच्या यशावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय.
“महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून उभा राहून एक नेता नेहमी भाषण करतो. मी मर्दांचा पक्ष आहे, माझ्यासमोर मर्द आहेत. मी तर नेहमी म्हणतो, आमच्यात शंका नाही, तुम्ही का दरवेळेला सांगत आहात. कुणाच्याच मनात शंका नाही. एक भाषण काढलं की 15 वेळा मर्द-मर्द. आता तरी कळलं की, मर्द आणि मर्दांगी कशाला म्हणतात, या तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर बघा. अहो उबाठाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो, गल्लीमध्ये ओरडलं म्हणजे सूर्य निघत नाही आणि सूर्यावर थुंकल्याने सूर्याचा अपमान होत नाही. तुमच्याच तोंडावर थुंकी पडते, म्हणून आज तुम्हाला ही चपराक बसली आहे”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी निशाणा साधला.
“त्यांचे (उद्धव ठाकरेंचे) सरदार पत्रकार पोपटलाल रोज सकाळी नऊ वाजता येतात, म्हणतात, राजकारणात अशी अवस्था आहे, पण मोदीजींचा असा फटका या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये बसला, तुम्ही ज्यांच्याबरोबर बसलात त्यांच्या मांडीला मांडी लावून तुमची काय अवस्था होईल हे काळ ठरवणार आहे”, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
“दुसऱ्यांच्या विजयात बँड बाजा वाजणारी ही उबाठाची लोकं आहेत. आता उद्या त्या रेड्डीला घेऊन येतील, त्याची मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करतील, अरे कधीतरी स्वत:च्या पायावर उभे राहा. पूर्वी 25 वर्षे उभे होता तेव्हा आमच्या जीवावर उभे होता. आता आमच्याकडून निघाल्यावर एकाकडून गेलात तर तिघांच्या डोक्यावर बसलात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी तिघांबरोबर बसलात”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
“आम्हाला आज कुठलाही उन्माद करायचा नाही. आम्हाला विनम्रतेने हे यश सेवेला आणि जनतेला अर्पित करायचं आहे. पण आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जो ना भगवान राम का, वो ना किसी के काम का. संजय राऊत तुम्ही राम वर्गणीची चेष्टा केलीत. राम जन्मभूमीच्या मंदिराच्या जागेच्या वादावर कूचेष्ठा केली उबाठाचे शिवसैनिक तुम्ही, राम मंदिराच्या कामात अडथळा येईल असं काम करणारे कपिल सिब्बल यांना तुम्ही वकील नेमलं”, अशी टीका शेलारांनी केली.
“राम ही काल्पनिक गोष्ट आहे अशी भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसशी तुम्ही मैत्री केली. रामसेतू ही कल्पना आहे, हे खरं नाही असं म्हणणाऱ्या उद्धवजी तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर बसलात, म्हणून तुम्हाला मी सांगतोय, उद्धवजी जो ना भगवान राम का, वो ना किसी के काम का. मुंबई आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल. जो गरिबांची सेवा करेल त्यालाच जनता आशीर्वाद देईल. राम मंदिराची सेवा करणाऱ्यांना भरभरुन आशीर्वाद मिळेल”, असं आशिष शेलार म्हणाले.