मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी कॅसिनोतला एक फोटो ट्विट केला. या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा सुरु होती. पण तो दावा चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपने फेटाळला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सविस्तर प्रतिक्रिया दिली. अशाप्रकारच्या आरोपांमधून आपल्या वैयक्तिक आयुष्याला आणि कुटुंबाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला गेला, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली. “एखाद्या फोटोवरुन कुणाची इमेज खराब करता येत नाही”, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
“मी मागच्या 34 वर्षांपासून राजकीय, समाजिक, सार्वजनिक जीवनात आहे. मी भाजप-शिवसेनेच्या युतीच्या काळातही अनेक वर्ष खूप काम केलं. त्यामुळे शिवसेनेतील आमचे जुने मित्रही मला ओळखतात. विधीमंडळात 20 वर्षांपासून आहे. विधीमंडळात माझे सर्वच मित्र आहेत. मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आम्ही मतदारसंघात चार-चार वेळा निवडून आलो. कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“आम्ही मोठ्या प्रमाणावर संघर्ष करुन, 34 वर्षे काम करुन इमेज तयार केली आहे. त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे, तरी त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ आहे. ही गोष्ट खरी आहे की, मला जे कळलं, परिवाराला ज्या पद्धतीने त्रास झाला, माझी मुलगी आणि माझी सून, आम्ही तीन दिवसांसाठी हाँगकाँगला गेलो. मी वर्षभर घरी जात नाही. त्यामुळे तीन दिवस मी कुटुंबाला दिला. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्या पद्धतीने डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचं दु:ख वाटलं”, अशी भावना बावनकुळेंनी व्यक्त केली.
“ठीक आहे, हा राजकारणाचा भाग आहे. वैयक्तिक जीवनात एखाद्या पर्याटनस्थळावर गेलं, हाँगकाँगच्या कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर कॅसिनोमधूनच क्रॉस लागतं. असं कुठलंच हॉटेल नाही ज्यातून कॅसिनो क्रॉस करता येत नाही. सुरक्षा व्यवस्था कडक आहे. 1 लाख रुपये घेऊन गेलं तरी सुरक्षा व्यवस्था प्रश्न उपस्थित करते. मग हाँगकाँगला माझा मित्र आहे, बँक अकाउंट आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तसं काही नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.