सुनील ढगे, नागपूर: माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. 40 आमदार (MLA) सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी ठाकरे यांच्या टीकेचा कडक समाचार घेतला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भीती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भीती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असंही ते म्हणाले.
आमचे 294 सरपंच विजयी झाले त्यामुळे ते नैराश्यात आहेत. त्यामुळेच माझ्या नावाचा उल्लेख ते सारखा करत असतात. भाजप नंबर एकचा पक्ष राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप योग्य वेळी उत्तर देईल. अडीच वर्षात त्यांनी तेच काम केलं. सूड भावनेने राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या दबावात येऊन राजकारण सुरु आहे, असंही ते म्हणाले.
भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू, असा इशाराही त्यांनी दिला.