सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करतायत. महाराष्ट्रासह देशात प्रचार सभा सुरु आहेत. देशात NDA विरुद्ध INDIA आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. आज हनुमान जयंती आहे, त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी पूजा आणि आरती केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित गर्दीने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. हनुमंताच दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं? म्हणून प्रश्न विचारला.
त्यावर फडणवीस म्हणाले की, “आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाइन हनुमान मंदिरात दर्शन घेतलं” “बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली. जी काही आपल्या राज्यावर, देशावर संकट येतात, ती दूर करण्याची प्रार्थना केली. बुद्धी आमच्याकरीता आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत’
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर “हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर प्रेम करणार” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही’
उद्धव ठाकरेंवर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. “उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात केलेलं एक काम दाखवा. 25 वर्ष मुंबई महापालिका हातात आहे, तिथे केलेलं काम दाखवा. तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.