येत्या 20 मे रोजी सोमवारी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. पण पाचवा टप्पा हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असेल. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण होईल. पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नाशिक येथे मतदान होणार आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहाजागा आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना आहे. पाचवा टप्पा महत्त्वाचा असल्याने प्रचाराला धार आली आहे. जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी ही अस्तित्व, वर्चस्वाची लढाई आहे.
या पाचव्या टप्प्याच्या मतदानआधी ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्रे फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीच पण त्यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. मुंबईत मतदानाचा शेवटचा टप्पा जवळ येत असताना भाजपाचे सर्व नेते उद्धव ठाकरेंना टार्गेट करतायत, मविआने टि्वट केलय, पाचवा फेज द उद्धव ठाकरे शो असं आहे का? असा प्रश्न उमेश कुमावत यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
‘दिल्लीची निवडणूक लढवतायत की, गल्लीची निवडणूक’
“हे 4 जूनला समजेल शो कोणाचा आहे? उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या काळात प्रचारात जी पातळी गाठलीय, त्यावरुन मला प्रश्न पडतो की, ते दिल्लीची निवडणूक लढवतायत की, गल्लीची निवडणूक. ज्या शब्दांचा ते उपयोग करतात, ज्या तऱ्हेचे पांचट जोक, पांचट टोमणे ते मारतात, हे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला अशोभनीय आहे, शोभणार नाही” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘मी माझा स्तर ठेवलाय, तो स्तर मी ठेवणार’
“त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत पातळीवर भाष्य केलय, त्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही व्यक्तीगत वक्तव्य केलं तरी, ते काय आहेत आणि मी काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. मी त्यांच्यावर व्यक्तीगत बोलायच ठरवलं, तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी असं करणार नाही. महाराष्ट्रातला प्रमुख नेता आहे. देशात महाराष्ट्रतला प्रमुख नेता म्हणून माझ्याकडे बघतात. मी माझा स्तर ठेवलाय, तो स्तर मी ठेवणार” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.