मुंबई: राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने पाडून दाखवावंच, या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
ते शनिवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘ सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.
दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील नेत्यांना भाजपकडून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात टीका केली होती. भाजपने हिंमत असेल तर समोर येऊन मर्दासारखं लढावं, असे उद्धव यांनी म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करण्याला पंतप्रधान मोदींचा विरोध आहे. ते या सगळ्यात कधी लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला तसा भाजप करणार नाही. मात्र, पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय गप्पही बसणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भीती बाळगावी, ज्यांनी नसेल केला त्यांनी निश्चिंत राहावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचलं होतं. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
VIDEO: सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल