मुंबई : “भारतीय जनता पक्ष घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचं काम करतच आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात मोर्चा काढून केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे”, असा दावा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे (Eknath Khadse on MNS Maha Morcha).
“राज ठाकरेंनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी जो लढा सुरु केलाय त्याला नक्की प्रतिसाद मिळेल. कारण या देशामध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे देशातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोटाप्रमाणे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. राज्य सरकारने राज ठाकरेंच्या मोर्चाची दखल घेऊन घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी त्वरीत पाऊलं उचलली पाहिजेत”, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला दिला.
“राज ठाकरेंनी काल (9 फेब्रुवारी) प्रचंड मोठा मोर्चा मुंबई शहरात काढला. या मोर्चाला अभूतपूर्व यश मिळालं. याचा अर्थ असा होतो की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशबाहेर हाकललं पाहिजे, असं जनसामान्याचं मत आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले (Eknath Khadse on MNS Maha Morcha).
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काल (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. मनसेच्या या महामोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक मुंबईत आले होते. मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चानिमित्ताने मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मनसेच्या विराट मोर्चामुळे मुंबई भगवामय झाली.
दरम्यान, मोर्चानंतर आझाद मैदानात केलेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांवर निशाणा साधला होता. “ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला होता.