मुंबईः नोएडा येथील नियमबाह्य ट्विन टॉवर (Noida Twin Tower) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानुसार रविवारी जमीनदोस्त करण्यात आले. पण मुंबईतदेखील अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई हवी. यासाठी आधी इमारतींचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. मुंबईत त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. मुंबईत शेकडो इमारती अनधिकृत आहेत. अनेक इमारतींना ओसी मिळालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं.
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून मुंबईतील इमारतींचं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. पत्रात ते लिहितात, ‘ काल नोएडातील ट्विन टॉवर्स पाडण्यात आले. मुंबईत शेकडो अनधिकृत टॉवर्स, हजारो अनधिकृत मजले अनेक वर्षांपासून बांधण्यात आले आहेत. त्यातील मध्यमवर्गीय सदनिधारक असुरक्षित, भीतीत आहेत. त्यांचे काय अशी चिंता आहे. नोएडातील प्रकरणावरून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रेरणा घेऊन मुंबईतल्या हजारो सदनिधारकांची काळजी करावी, अशी विनंती…
मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ते म्हणाले, बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक, अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली आहे. सदनिधाकरकांनी तसेच सोसायटीने चौकशी केल्यानंतर त्यांना अनधिकृत मजल्यांचा एफएसआय, टीडीआर घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना पार्ट ओसी देण्यात आला आहे. अशा हजारो सदनिका मध्यमवर्गीयांना विकल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत टॉवर्स, अनधिकृत मजल्यांचे तसेच ज्या इमारतींना अजूनही भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेली नाही, त्यांचे स्पेशल ऑडिट व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांचं दापोली येथील रिसॉर्ट अनधिकृत असून सरकारने या रिसॉर्टवरदेखील आधी कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. नोएडा येथील नियमबाह्य ट्विन टॉवर 12 सेकंदात उध्वस्त करण्यात आले, तसं हे रिसॉर्टदेखील 12 सेकंदात पाडा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.