मुंबईः मी आजारी असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा आवर्जून उल्लेख केलाय. मात्र उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तर त्यांना सणसणीत प्रश्न विचारलाय. तुम्ही त्या वेळेला गुंगीत होता तर मग तुमचा मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? त्या तुम्ही प्रश्न विचारला नाही, मग इतरांना तरी कोणत्या अधिकारातून प्रश्न विचारताय? असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीयेत त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे अंधारात पत्रकार परिषदा घ्याव्या लागतायत, असा टोलादेखील नितेश राणेंनी लगावला.
मी आजारी असताना बंडखोरांनी डाव साधल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, ‘ तुम्ही जेव्हा गुंगीत होता, तेव्हा तुमची तब्येत खराब होती तर तुमचा मुलगा दावोसला काय करत होता? मुलाला वाटलं नाही का, वडील आजारी आहेत तर तो डावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? मग गुंगीत असताना तुम्ही मुलाला प्रश्न विचारू शकत नाहीत तर अन्य लोकांना विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?
बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव न लावता निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंच्या वतीनं देण्यात आलं. यावर नितेश राणे म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे म्हणतायत, माझ्या बापाचा फोटो लावू नका. तुमच्या आई-वडिलांचा फोटो लावा… पण अजूनही उद्धव ठाकरेंना कळलं नाही की बाळासाहेब ठाकरेंना महाराष्ट्रात असंख्य लोकांचे दैवत मानतात. आपल्याच बाळासाहेबांना किती लहान करणार, हे अजूनपर्यंत त्यांना न कळल्याने हे दिवस आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकरांना दैवत मानतो. त्यांच्या कुटुंबियांनी येऊन सांगितलं, त्यांचे फोटो लावू नका असं म्हटलंय का कधी? पण उद्धव ठाकरेंना हे न कळतच नाहीये. बाळासाहेब ही कुणाची मक्तेदारी होऊ शकत नाही. मग तुम्ही शिवाजी पार्कला कशाला स्मारक बांधताय? ती ज्योत कशाला पेटत ठेवलीय? त्याला टाळं लावून टाका.. तुम्ही तुमच्या वडलांसाठी बांधलं असेल तर महाराष्ट्रातील जनता तिथे का नतमस्तक व्हायला जाते?