दोन दिवसांपूर्वी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण रंगलं आहे. “अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला, त्यात पोलिसांचा जीव जावा अशी महाविकास आघाडीच्या लोकांची इच्छा होती का?. अक्षय शिंदे महात्मा होता का? त्याचं चरित्र बघून, मग नालायकासारखी बाजू घ्या” अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मविआवर हल्लाबोल केला आहे.
“देशाचे गृहमंत्री अमित शाहसाहेब हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राऊतला मिर्च्या लागत आहेत. जे तुझ्या घरकोंबड्या पक्षप्रमुखाला जमत नाही. भाजपाचा कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी संघटना आणि पक्ष याला प्राधान्य देतो, याचं उत्तम उदाहरणं म्हणजे मोदी-शाह, फडणवीस आहेत” असं नितेश राणे म्हणाले. “हा विषय राऊतला समजणार नाही आणि पटणार नाही. तुला आणि तुझ्या घरकोंबड्या मालकाला भाजपा कार्यकर्त्यांचा गुण कळणार नाही. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही, असे असंख्य शिवसैनिक आहेत, ज्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही” असा दावा नितेश राणे यांनी केला.
‘जुने दिवस आठवं आणि आपलं तोंड उघड’
“अमित भाईंच्या पक्ष निष्ठेबाबत तुम्हाला समजणार नाही. हे फक्त टीका करू शकतात बाकी काय नाय, देशाचे गृहमंत्री असले तरी सर्वात ताकदीचे गृहमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. असे अमित शहा पक्षाच्या कामाला वेळ देतात ही पक्ष निष्ठा ह्यांना कळणार नाही” असं नितेश राणे संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले. “राऊतने पत्राचाळच्या चौकात जाऊन उभे राहून दाखवावे आणि सकाळी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी. जुने दिवस आठवं आणि आपलं तोंड उघड” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
‘महाविकास आघाडीच्या काळात सगळे शक्ती कापूरच्या भूमिकेत’
“अजित पवार यांचं काय वाईट झालं? कोणी वापरलं आणि सोडलं हे अजित दादांना माहित आहे. वापरा आणि फेका ह्यात तुझ्या मालकाने phd केली आहे” असं नितेश राणे म्हणाले. “भाजपा हरेल हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. आमच्या विजयी मिरवणुकीत संजय राऊत नाचताना दिसेल” असं नितेश राणे म्हणाले.