गजानन उमाटे, नागपूर: केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी थेट संघ (rss) स्वयंसेवकांनाच सेक्युलर (secular) या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्व धर्मांचा सन्मान करा असा आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. संघाच्या भारत रक्षा कार्यक्रमात गडकरी बोलत होते. दुर्बल व्यक्तीने शांती आणि अहिंसेवर कितीही बोललं तरी लोक गांभीर्याने घेत नाहीत. सामर्थ्यवान व्यक्ती बोलली की त्यांचं लोक ऐकतात, असं गडकरी म्हणाले.
चांगल्या गोष्टी समोर येत नाही. पण उत्साहात एखादी गोष्ट बोलली तर टीव्हीवर वारंवार दाखवलं जातं, असंही नितीन गडकरी म्हणाले. राष्ट्रवाद सर्वात महत्त्वाचा आहे. देशाला सर्व क्षेत्रात अव्वल करण्याचं स्वप्न घेऊन आपण काम करतोय. दीनदयाल उपाध्याय यांनी जो अंत्योदयाचा मंत्र दिला त्यानुसार आपण काम करत आहोत. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आपण स्वीकारली आहे. फक्त माझं कल्याण होऊ दे असं नाही, सर्वाचं कल्याण व्हायला हवं, असं नितीन गडकरी म्हणाले.
कुठल्याही व्यक्तीला गुण दोषासह आपण स्वीकारतो. त्यानंतर त्यात बदल घडवून आणतो. हेच राष्ट्रनिर्माण आहे. जगात भारत वेगाने प्रगती करतोय, असंही त्यांनी सांगितलं.
माझी प्रकृती काही दिवसांपूर्वी चांगली नव्हती. मी रोज एक तास प्राणायाम करतोय, असं त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती देताना सांगितलं.
यावेळी गडकरींनी त्यांच्या कमाईचा फंडाही सांगितला. आपल्याला कसा आर्थिक लाभ होतो, हे त्यांनी स्पष्ट केलं. युट्यूबवर माझे कार्यक्रम येत असतात. त्यातून मला महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये मिळतात, अशी माहितीही त्यांनी दिली.