बीड (सावरगाव) : बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी रोखठोक भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी कष्टकरी, वंचितांना पुढे घेऊन जाण्याबाबत मत मांडलं. यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील आजच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणाचा संदर्भ दिला.
“मगाशी माझं हेलिकॉप्टर उडलं, परत खाली बसलं. तुम्हाला कदाचित काळजी वाटली असेल. मला वाटलं कुणाची दृष्ट लागली की मेळाव्याला. सकाळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा बघत होते. सन्मानीय परमपूज्यनीय मोहन भागवत यांचं भाषण ऐकत होते. ते संदेश देत होते की, या देशात भेदभाव व्हायला नको. अरे मुंडे साहेबांनी राजकारण सुद्धा त्याच्यावरच केलं की, हा भेदभाव मिटला पाहिजे. या मंचावर कोण नाहीय? सगळ्या जाती-धर्माचे, विचारांचे आहेत. या मंचावर पोहोचलेला माणूस कष्ट करुन पोहोचला आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मला मुंडे साहेबांनी शिकवलंय आपण ज्या मातीत जन्माला येतो, त्या मातीचा, जातीचा अपमान वाटता कामा नये. जो मोठ्या जातीत जन्म घेतो, राजघराण्यात जन्म घेतो त्यांना सुद्धा गर्व वाटू नये. आणि जो गरीब, बिछड्या जातीत, वंचितांमध्ये जन्म घेतो त्याचीसुद्धा मान खाली जायला नको. यासाठी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात, महामानव डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आज जी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीला दिशा देण्यासाठी भक्ती आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मताचं राजकारण नाही. सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते. छोटीची ज्योत ही मोठी मशाल बनून पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाते”. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“ही वंचितांची लढाई अटळ आहे. सरकार कुणाचंही असो. उपाशी माणूस उपाशीच आहे. ज्याचं पोट भरलंय त्याचं आणखी मोठं पोट होतंय. मी काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष आलं. पण माझ्या आय़ुष्यात मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवान बाबांची मुर्ती आहे. या पवित्र स्थानावर उच्चार करायचा नाही, अशा कोणत्याशी शब्दाचा मी उच्चार करणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीवर बोलून सुद्धा भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख मला करायचा नाही. आणि अशा कुठल्याही प्रवृत्तीचा मला उल्लेख करायचा नाही. जे लोक खूश होत आहेत की, पंकजा ताई घरात बसल्यात. माझा दौरा लिहून घ्या, मी आता 17 ते 20 दिल्लीत आहे. त्यानंतर मी 23 ते 25 मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर मी 29 ते 31 ऑक्टोबरला आहे. आणि 12 डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे”, असं म्हणत पंकजा यांनी त्यांच्या दौऱ्याची माहिती दिली.
“मी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या ऐकू आल्या का तुम्हाला? समोर उपस्थित सर्व वडिलधारी मंडळी, युवा बांधव आणि मातांनो, काय सोहळा आहे, इतका देखणा सोहळा, इतका रांगळा सोहळा, मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असेल. हेलिकॉप्टरमधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठे? आहे का? मी वरुन फुलं टाकत होते, भगवान बाबा आणि तुमच्या चरणी. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते. मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात, तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते”, असंदेखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?
पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, जानकर म्हणतात, मेलो तरी साथ सोडणार नाही