त्रिपुरा : काँग्रेसच्या सत्तेचा विक्रम भाजप तोडेल आणि 2047 सालापर्यंत भाजप सत्तेत राहील, अशी भविष्यवाणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. “स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील.” असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी त्रिपुरातील अगरतल्ला येथे व्यक्त केला.
“देशात सर्वात जास्त सत्तेत कोणता पक्ष राहिला असेल, तर तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसने 1950 ते 1977 अशा काळात सलग सत्तेत राहण्याचा विक्रम केला. मात्र, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, मोदीजी हा विक्रम तोडणार आहेत. 2047 साली भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत भाजप सत्तेत राहील.”, असे राम माधव म्हणाले.
सैन्याचा आधार घेत आम्ही विजय मिळवला नाही. तर गेल्या पाच वर्षात धार्मिक अशांतता, भ्रष्टाचार रोखण्यात आम्हाला यश आलं. तसेच, मजबूत भारताची निर्मिती केली आणि आर्थिक स्थैर्य आणलं, त्यामुळे आम्हाला विजय मिळाला.” असेही राम माधव म्हणाले.
त्रिपुरात लोकसभेच्या दोनच जागा आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानिमित्तच आगरतला येथे भाजपकडून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राम माधव यांनीच लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी, भाजपला बहुमत मिळणार नाही, सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल, असे भाकित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. मित्रपक्षांशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकते, इतकं बहुमत भाजपला मिळालं.