नवी दिल्ली : ईव्हीएम हॅकिंगबाबत लंडनमध्ये काँग्रेसने केवळ राजकीय स्टंट केला. भारतीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा या स्टंटचा उद्देश होता, असा पलटवार भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. भाजपने ईव्हीएम हॅक करुन 2014 साली विजय मिळवला, असा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाने (Syed Shuja) केल्यानंतर, देशभरात खळबळ उडाली आहे. त्या दाव्यावर आज भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन पलटवार करण्यात आला.
मुंडेंबाबत खळबळजनक दावा करणारा हॅकर सय्यद शुजा नेमका कोण आहे?
“नॅशनल हेराल्ड पुरस्कृत पत्रकार परिषद झाली. लंडनमधील हॅकरचा दावा राजकीय हेतूने प्रेरित होता. पत्रकार परिषद आयोजित करणारे आशिष रे हे राहुल गांधी यांना लंडनमध्ये भेटलेले. सोशल मीडियावर भाजपविरोधी कॅम्पेन आशिष रे चालवतात. पत्रकार परिषदेचं पूर्ण आयोजन काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलं होतं.”, असा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.
सुप्रिया सुळेंच्या दोन मागण्या, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी नको आणि….
ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांमुळे देशातील 90 कोटी मतदारांचा अपमान झाला आहे, असा आरोप करतानाच रवीशंकर प्रसाद यांनी सवाल उपस्थित केला की, 2014 च्या निवडणुकीपूर्वी यूपीए सरकार केंद्रात सत्तेत होतं, सत्तेत नसताना आम्ही ईव्हीएम हॅकिंग करु शकतो असं होऊ शकतं का?
कपिल सिब्बल तिथे काय करत होते? : रवीशंकर प्रसाद
“काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल पत्रकार परिषदेत उपस्थित होते, ते कशासाठी? कोणत्या हेतूसाठी ते त्या ठिकाणी गेले होते, याचं उत्तर द्यावं. कपिल सिब्बल काँग्रेसकडून मॉनिटरिंग करत होते.”, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, राफेलचं सत्य काँग्रेस स्वीकारत नाही, सीबीआयवर, सीव्हीसीवर आरोप केले जातात, सुनियोजित पद्धतीने देशाच्या स्वायत्त संस्थावर आरोप करण्याचं काम कॉग्रेस करतंय, असा घणाघातही रवीशंकर प्रसाद यांनी या पत्रकार परिषदेतून केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल रवीशंकर प्रसाद काय म्हणाले?
यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घातपात नसल्याचा दावा केला. रवीशंकर प्रसाद म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंचे निधन कार अपघातात झालं. शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमोर्टम केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याचं सांगितलं होतं. गोपीनाथ मुंडे आमचे मोठे नेते होते, त्यांच्याबाबत अशाप्रकारचा आरोप करणं अशोभनीय आहे.
“शपथग्रहणानंतर गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत कार अपघातात निधन झालं. सुधीर गुप्ता एम्सच्या डॉक्टरांनी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. त्यांनी स्वत: 2 टीव्ही चॅनल्सवर सांगितलं होतं की मी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू कार अपघातात त्यांच्या मानेला दुखापत झाल्याने झाला”. – रवीशंकर प्रसाद
रवीशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
– परदेशातून भारतीय लोकशाहीची बदनामी केली जातेय – रवीशंकर प्रसाद
– कपिल सिब्बल लंडनमधील हॅकिंगसंदर्भातील पत्रकार परिषदेत काय करत होते? – रवीशंकर प्रसाद
– हॅकिंगसंदर्भात आरोप करुन, जनतेच्या मतांचा अपमान केला जातोय – रवीशंकर प्रसाद
– 2014 साली आम्ही सत्तेत नव्हतो, मग निवडणूक आयोगावर आम्ही नियंत्रण कसं मिळवू शकतो? – रवीशंकर प्रसाद
– 2019 ला पराभूत होण्याचं कारण काँग्रेस आतापासून शोधतेय – रवीशंकर प्रसाद
– राहुल गांधी अभ्यास करत नाही, हे माहित होतं, मात्र राहुल गांधी यांची संपूर्ण टीम अभ्यास करत नाही, हे आज माहित पडलं – रवीशंकर प्रसाद
– अशा किती कुरापती राहुल गांधी अजून करणार आहेत? – रवीशंकर प्रसाद
– हॅकरने कोणताही पुरावा दिलेला नाही – रवीशंकर प्रसाद
– काँग्रेसने 90 कोटी मतदारांचा अपमान केला – रवीशंकर प्रसाद
– हॅकिंगबाबत लंडनमध्ये काँग्रेसने केवळ राजकीय स्टंट केला, लोकशाहीला बदनाम करण्याचा उद्देश – रवीशंकर प्रसाद