लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. भाजपाने सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. पण यावेळी त्यांना स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही. या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही दिग्गजांचा पराभव झाला. यात प्रामुख्याने चर्चा झाली, ती स्मृती इराणी यांच्या पराभवाची. गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीमधून त्यांनी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. 2014 मध्ये काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी स्मृती इराणींचा पराभव केला. पण 2019 मध्ये स्मृती इराणी जायंट किलर ठरल्या. त्यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींना हरवलं. पण 2024 मध्ये गांधी कुटुंबाचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. अमेठीमध्ये झालेल्या या पराभवावर आता स्मृती इराणी व्यक्त झाल्या आहेत. “माझ्यासाठी अमेठी एक भावनिक आणि वैचारिक मुद्दा आहे. या हाय-प्रोफाइल निवडणुकीत पराभव झाल्याने मी निराश नाहीय” असं त्या म्हणाल्या.
“अमेठीमध्ये झालेल्या माझ्या पराभवाची मला चिंता नाहीय. अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता. अजूनपर्यंत फक्त नरेंद्र मोदी पराभूत झालेले नाहीत. माझा याआधी सुद्धा पराभव झालाय. 2004 साली चांदनी चौक आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता” असं स्मृती इराणी म्हणाल्या. त्या पॉडकास्टमध्ये बोलत होत्या. “निवडणुका येतील-जातील. पण 1 लाख कुटुंब आज त्यांच्या घरात राहतायत हा माझा खरा विजय आहे. 80 हजार घरांपर्यंत वीज पोहोचली. 2 लाख कुटुंबांना पहिल्यांदा गॅस सिलिंडर मिळाला” असं इराणी म्हणाल्या.
त्यांनी तिथे घरही विकत घेतलं
अमेठीमध्ये खासदार दिसत नाही, अशी तिथे चर्चा असायची. पण मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही हे स्मृती इराणी यांनी सुनिश्चित केलं. त्यांनी तिथे घरही विकत घेतलं. स्मृती इराणी यांचं हे वक्तव्य म्हणजे राहुल गांधीसाठी टोमणा आहे. राहुल गांधी यांनी तीनवेळा अमेठीमधून खासदारकीची निवडणूक जिंकली आहे.
‘रात्री 11 वाजता मला फोन आला’
“22 मार्च 2014 रोजी मला राजनाथ सिंह यांचा रात्री 11 वाजता फोन आला. ते मला म्हणाले अमेठीला जाऊन निवडणूक लढवावी लागेल. मी कुठलीही तक्रार न करता चॅलेंज स्वीकारल” असं स्मृती इराणी म्हणाल्या. “मी तिथे गेलें, पाहिलं, स्वातंत्र्य मिळाल्यापासून 40 गावात रस्ते नव्हते. मागच्या पाच वर्षात मी 1 लाख कुटुंबांसाठी घर बांधली, 3.5 लाख स्वच्छतागृह उभारली. 4 लाख लोकांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेशी जोडलं. जवळपास 2 लाख कुटुंबाना गॅस सिलिंडर पहिल्यांदा मिळाला” असं स्मृती इराणी म्हणाल्या.