नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असलं तरी भाजपने आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात वर्चस्व मिळवण्यासाठी आता भाजप उत्तर प्रदेशातील राजकीय रणनीती बदलणार आहे. उत्तर प्रदेशात हिंदुत्वावर भाजप फोकस करणार आहेच. पण त्यांना मुस्लिम मतेही मिळवायचे आहे. आधी ज्या समुदायापासून चार हात लांब राहिले, आता त्यांना सोबत घेणं ही भाजपची मजबुरी झाली आहे. त्यामुळेच मुस्लिम समुदायाला आपल्याकडे खेचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बातवर ऊर्दूत एक पुस्तक येणार आहे. हे पुस्तक उत्तर प्रदेशातील प्रत्येक मुस्लिम घरात पाठवण्यात येणार आहे.
150 पानांची ही पुस्तक असणार आहे. भाजप ही एक लाख पुस्तके छापणार आहे. रमजानच्या काळात हे पुस्तक वितरीत केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बातचा प्रत्येक संदेश मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे. उर्दुतच ही पुस्तक छापली जाणार आहे. मुस्लिमांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. मुस्लिमांना आकर्षित करण्याचं मिशन मोठं आहे. त्यामुळे प्रचारही त्याच पद्धतीने केला जाणार आहे. रमजानच्या निमित्ताने भाजप उत्तर प्रदेशात एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्याच कार्यक्रमातून 80 लोकसभा जागांवरील मुस्लिम समुदायांमध्ये पुस्तकाचं वितरण केलं जाणार आहे. मुस्लिम स्कॉलर्स, विद्यार्थी, उर्दू वाचक आदी भाजपचे टार्गेट आहेत. या रणनीतीद्वारे भाजप पराभूत झालेल्या 14 लोकसभआ जागांवर फोकस करणार आहे.
2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये जे मुद्दे मांडले होते. त्यावर हे पुस्तक आधारीत असणार आहे. भाजपच्या विरोधात उत्तर प्रदेशातील 14 लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी मुस्लिमांमध्ये वातावरण तयार केले होते. त्यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्या मतदारसंघावर आम्ही फोकस केला आहे. तिथे आम्हाला विजय मिळवायचा आहे. म्हणूनच मोदींची मन की बात ऊर्दूत मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात मुस्लिमांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा एक भाग आहे. मात्र, मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशात पंचसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार मुस्लिम स्नेह मिलन संमेलन कार्यक्रम, सुफी संमेलन, पसमांदा संमेलन आदी कार्यक्रमांवर भाजपने फोकस केला आहे. यात स्नेह संमेलन अधिक महत्त्वाचं मानलं जात आहे. या माध्यामातून भाजपला मुस्लिम समुदायात एक देश एक डिएनएचा संदेश द्यायचा आहे.
उत्तर प्रदेशात मुस्लिमांची 85 टक्के लोकसंख्या आहे. त्यात मुस्लिमांच्या 41 जाती आहेत. त्यात कुरैशी, अन्सारी, सलमानी, शाह, राईन, मन्सुरी, तेली, सैफी, अब्बासी, घाडे आणि सिद्दीकी या जाती प्रमुख आहेत. याच मुस्लिम वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्लान आहे. उत्तर प्रदेशात 20 टक्के मुस्लिम मतदार आहेत. दोन डझनहून अधिक जिल्ह्यांवर मुस्लिम समुदायांचा प्रभाव आहे. या दोन डझन जिल्ह्यात 20 ते 65 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेशातील 90 हून अधिक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. तर 29 लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. त्यामुळेच भाजपने सध्या यूपीवर फोकस ठेवला आहे.