मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन शिवसेनेवर सडकून टीका केलीय. तसेच शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याचा आरोप केलाय. भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप यांची तुलना केलीय. तसेच शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी भूमिका घेतेय, असा आरोप केला (BJP MLA Atul Bhatkhalkar criticize Shivsena over Dhananjay Munde and M J Akbar Case).
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल?”
दरम्यान, याआधीही भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केलेली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवलीय. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. तसं पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलंय.
शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ…
एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल??? pic.twitter.com/WUYL1B8upn— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 20, 2021
‘मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये अग्रलेख पाडा की’, अतुल भातखळकरांचा राऊतांना जोरदार टोला
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या जावयाचं ड्रग्ज प्रकरणातील नाव, यावरुन भातखळकरांनी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांत सामनातील अग्रलेखातून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, आता धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय.
हीच वेळ साधत अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. “मुंडे आणि मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की, जोरदार समर्थन करा आणि केंद्र सरकार कसं दोषी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत”, अशा शब्दात भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला हाणला.
नवाब मलिकांवर निशाणा
ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाचं नाव आल्यानंतर भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?”, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :