पुणे : पुण्याच्या माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या मुलाने मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ‘कॅब’ अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन कुणाल टिळक (Kunal Tilak Tweets on CAB) यांनी ट्विटरवरुन आपलं मत मांडलं आहे.
‘लोक विचारत आहेत, आता पुढे काय? एवढ्या कमी वेळात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं आणि निर्णय हे अर्थव्यवस्थेला पांगळी करत आहेत, उपजीविकेची साधनं धोक्यात घालत आहेत आणि सरकारी स्रोतांवर प्रचंड ताण आणत आहेत, हे त्यांना कळत नसावं’ असं कुणाल टिळक यांनी ट्वीट केलं आहे.
People asking What’s Next ? maybe don’t understand that these slew of landmark bills and decisions in such a short time is crippling the economy, endangering livelihoods & putting a huge strain on govt resources. #CitizenshipAmmendmentBill2019
— KUNAL TILAK (@kunal_tilak) December 12, 2019
‘ही शर्यत थांबवण्याची आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळण्याची वेळ कदाचित आली आहे. राज्यं जळत आहेत आणि तज्ज्ञ काही म्हणू देत, पण सामान्य जनतेचे हाल होत आहेत’ अशा आशयाचं ट्वीट कुणाल टिळक यांनी केलं आहे.
Maybe it’s time to give a rest to this race & take control of the situation. States are burning & people are suffering no matter what experts have to say. #CitizenshipAmendmentBill2019
— KUNAL TILAK (@kunal_tilak) December 12, 2019
मुक्ता टिळक या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. अर्थातच कुणाल टिळक हे लोकमान्य टिळकांचे खापरपणतू. त्यामुळे टिळकांचा वारसा सांगणाऱ्या या तरुणाच्या मताला वेगळं महत्त्व आहे.
याच ट्वीटसंदर्भात ‘टीव्ही9 मराठी’ने कुणाल टिळक यांना विचारलं असता त्यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं. याचा भाजप किंवा आई मुक्ता टिळक यांच्या आमदारकीशी संबंध नसल्याचं ते म्हणाले.
‘कॅब आणि स्थलांतराबाबत माझा अभ्यास आहे. याआधी ट्रिपल तलाक, जम्मू काश्मीर, अयोध्या निकाल आणि आता कॅब यासारखे निर्णय कमी कालावधीत झाल्यामुळे सरकारी यंत्रणांवर तणाव आला. आधी जम्मू काश्मीर, तर आता आसाम त्रिपुरामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत आणि अर्थव्यवस्था ढिली पडत असल्याचा प्रश्न मी ट्विटरवर मांडल्याचं कुणाल टिळक म्हणतात.
मोदी सरकारने जाहीरनाम्यात जे झालं, ते करुन दाखवलं, ही चांगली बाजू आहे. मात्र सरकारचं होमवर्क कमी पडल्याचं निरीक्षण कुणाल यांनी नोंदवलं. कॅबच्या निषेधार्थ ईशान्य राज्यांमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली (Kunal Tilak Tweets on CAB) आहे.