(गिरीश गायकवाड) “आमच्या महायुती सरकाराच्या काळात हिट अँड रनच्या दोन केसेस घडल्या आहेत. या दोन्ही केसेसमध्ये आरोपी कोण आहे? किती श्रीमंत आहे? हे न बघता कुठलीही तडजोड न करता कारवाई केली जात आहे. पुण्यात स्वतः गृहमंत्री फडणवीस तिथे गेले होते. वरळीमध्ये सुद्धा मिहीर शाह वर कारवाई केली जाईल. आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शक पणे कारवाई करणार. जो आरोपी बिळात बसलाय, त्याला आम्ही शोधून काढणार” असं नितेश राणे म्हणाले. “आमच्या वर आरोप करणाऱ्यांनी एकदा बघावं की मविआच्या काळात काय झालं?. दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरणात नेमकं काय आलं? त्यात एवढी तत्परता का दाखवली नाही? त्यात मुख्यमंत्री यांचा मुलगा होता म्हणून, मस्टरचे कागद फाडले” असा आरोप नितेश राणे यांनी केला.
“वाघ नखांवर इंद्रजित सावंत यांची पत्रकार परिषद पाहिली. जर महाविकास आघाडीच सरकार वाघ नखं आणत असतं, तर असाच विरोध त्यांनी केला असता का? हीच त्यांची भूमिका असती का?. इंद्रजित सावंत कोणासोबत बसतात उठतात हे सगळे आम्हाला माहितीये. महाराजांच्या किल्यावर दर्गे बांधले जातायत, हिरव्या चादरी चढवल्या जातायत त्यावेळी तुम्ही का बोलले नाही” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “शिवाजी महाराजांवर राजकारण करू नये. वाघ नखं येतायत त्याचं कौतुक करायला हवं. महाविकास आघाडीच्या काळात इंद्रजीत सावंत वळवळ करत बाहेर का आले नाही?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
एक नातू ड्रायव्हर दुसरा नातू नाच्या
“रोहित पवार यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडावी. अडीच वर्ष समृद्धी महामार्ग बाबत गप्प का होते?. पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर दुसरा नातू नाच्या परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. याला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.