यवतमाळ : भाजप आमदार राजू तोडसाम हे नेहमीच काही ना काही कारणामुळे वादात असतात. अनेकदा त्यांचं चर्चेत राहण्याचे विषय राजकीय असतात. मात्र, यावेळी घरगुती भांडणामुळे ते चर्चेत आले आहेत. बरं हे भांडण घरगुती म्हणजे घरात झालं असंही नाही. तर थेट भर रस्त्यावरच घरातलं भांडणं झाल्याने अवघ्या मतदारसंघाला माहिती पडलं. भांडणाचं कारणही असंय की, चर्चा तर होणारच.
झालं असं की, आर्णी-केळापूर मतदरासंघातील भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांचं हे भाडण. हे प्रकरण असंय की, आमदार तोडसाम यांची पहिली बायको वेगळी राहते. आपल्याकडे राजू तोडसाम लक्षच देत नाहीत, राहतच नाहीत, असा आरोप पहिल्या बायकोचा आहे. या दोन बायकांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी सुरु झाली.
हा सर्व प्रकार कुठे झाला, तर कबड्डीच्या कार्यक्रमात. आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडामधील वाय पॉईंट येथे कबड्डीचे सामने ठेवण्यात आले होते. कबड्डी राहिली बाजूला. किंबहुना, कबड्डी पाहण्यासाठी आलेले लोक आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांची भांडणं पाहूनच परतली.
आमदार राजू तोडसाम यांच्या समर्थकांनाही पहिल्या बायकोच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे हे भांडणं अधिकच वाढलं. नंतर पोलिस ठाण्यात हे भांडण मिटवणं सुरु होतं. मात्र, बायकांचं भांडणं ते, मिटतंय कसलं!