उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालंय. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षा आहे. अशावेळी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असं सांगून भागणार नाही. तर त्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका घ्याययला हवी. शेतीमालाचे 100 टक्के नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी राणा जगजितसिंह यांनी केलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त पर्यटनाला येवू नये. आधी मदत जाहीर करावी त्यानंतर दौरा करावा, असा थेट निशाणा राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला. तसंच मदत जाहीर करुन जर दौरा केला तर त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत करु, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे. शेतमालाचे 100 टक्के नुकसान झाले आहे. सरकारकडे सर्व शेतकऱ्यांची यादी आहे, खाते क्रमांक आहे. त्यामुळे पंचनाम्यात वेळ काढू नये. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. कागदी घोडे नाचविण्यात काहीही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नका, शासन सगळी मदत करेल, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
हे ही वाचा :
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द
महाराष्ट्रात संकटांची मालिका, मराठवाडा जलमय, केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!