मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या तुफान राड्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवर सरकारकडून 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपच्या निलंबित आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा अशी मागणी या आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केलीय. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर आशिष शेलार, संजय कुटे यांनी सरकारवर तोफ डागलीय. (12 suspended BJP MLAs met Governor Bhagat Singh Koshyari)
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईनंतर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल मागवण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासून उचित निर्णय घेऊ असं आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिलं आहे, अशी माहिती शेलार यांनी दिलीय. सभागृहातच नाही तर अन्य कुठेही भाजपच्या एकाही सदस्याने अपशब्द उच्चारला नाही. झालेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही. काहीजणांकडून सोशल मीडियावर पसरवले जात असलेल्या व्हिडीओमध्ये असं कुठेही दिसून येत नाही की, भाजप आमदारांनी सभागृहाचा किंवा तालिका अध्यक्षांचा अवमान केलाय, असा दावा शेलार यांनी केलाय.
ठाकरे सरकारनं आज लोकशाही मूल्याची प्रेतयात्रा काढली आहे. या कारवाईमुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपच्या लढाईला अजून गती प्राप्त होईल. तासभर चर्चा करुन 12 चा आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय? असा सवाल शेलार यांनी केलाय. राज्यपालांपुढे सत्यकथन केल्यानंतर उचित कारवाईच्या त्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी आहोत, असंही शेलार यांनी म्हटलंय.
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
संबंधित बातम्या :
विधानसभेत जोरदार राडा, भाजपच्या कोणत्या आमदारांवर कारवाईची शक्यता?
Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?
12 suspended BJP MLAs met Governor Bhagat Singh Koshyari