भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, पाहा कोण असेल मनसेचा उमेदवार?

| Updated on: Mar 18, 2024 | 9:51 PM

महायुतीत आणखी एका पक्षाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएमध्ये मनसेला घेण्याची शक्यता वाढली आहे.

भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, पाहा कोण असेल मनसेचा उमेदवार?
Follow us on

Loksabha election 2024 : भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवरही फैसला होईल. महायुतीत भाजपला सोबत घेण्याच्या निर्णय अंतिम टप्प्यात असून त्यासाठी राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत. विशेष म्हणजे संध्याकाळीच फडणवीसही दिल्लीतही दाखल झालेत. त्यामुळं भाजप-मनसे युतीसह मनसेला महायुतीत घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत. राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही सोबत आहेत. विशेष म्हणजेच गेल्या 3-4 दिवसांतला राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे, या दौऱ्यातही त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी भेटलेत. लोकसभा निवडणुकीआधी मनसेला सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईतील लोकसभेची 1 जागा देऊन आणि इतर वाटाघाटी करुन मनसेला सोबत घेण्यावर भाजपची चर्चा सुरु आहे. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देऊन त्यांना महायुतीत घेण्यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून मनसेकडून
बाळा नांदगावकर महायुतीचे मनसेकडून उमेदवार असू शकतात.

भाजप-मनसे युतीवरुन स्वत: फडणवीसांनीही गेल्या 2-4 दिवसांत सकारात्मकच प्रतिक्रिया दिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वत: राज ठाकरे असो की मनसेचे नेते भाजपवर टीका टाळतायत..आणि राज ठाकरेंनीही यापुढे मनसेचा प्रवास सत्तेच्या दिशेनं असेल असं म्हटलेलंच आहे.

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महायुतीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. आता मनसेचा समावेश झाल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल.

बिहारमध्ये एनडीएची जागावाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील लवकरच जागावाटपाची घोषणा होऊ शकते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे देखील दिल्लीत आहे.

आज रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची बैठक होणार असल्याची देखील माहिती पुढे येत आहे. त्यामुळे महायुतीत आणखी एक पक्ष वाढण्याची शक्यता आहे.