नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झाल्यामुळे संजय धोत्रे नव्याने प्रकाशझोतात आले होते. संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांची मंत्री म्हणून कामगिरी चांगली असली तरी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मंत्रिमंडळात जातीय समतोल साधण्यासाठी संजय धोत्रे यांचा नाहक बळी गेला, अशीही चर्चा रंगली होती.
संजय धोत्रे हे भाजपच्या मातब्बर खासदारांपैकी एक आहेत. 2019 मध्ये त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळवला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते.
संजय धोत्रे यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1959 रोजी अकोला जिल्ह्यातील पळसो बढे या गावात झाला. शेतकरी कुटुंबातील संजय धोत्रे यांनी भियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल पदवी प्राप्त केली. आपल्या कुटुंबाचा पारंपरिक शेती व्यवसाय बघताना माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी उत्पादन निर्मिती, अॅग्रो फूड प्रोसेसिंग व्यवसायतही ते उतरले. व्यवसायातील प्रचंड मेहनतीमुळे त्यांना 1987 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उद्योजकता पुरस्कार मिळाला. कृषी क्षेत्रात अतुलनीय कामाबद्दल 1999 मध्ये त्यांना स्व. वसंतराव नाईक मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संजय धोत्रे महाविद्यालयात असताना विद्यार्थी आणि शेतकरी चळवळीत सक्रिय होते. महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी यासारख्या पदांवर काम केले होते. शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी त्यांनी शेतकरी चळवळीत हिरीरीने सहभाग नव्हे, तर लढा दिला. त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीने ते राजकारणात पोहोचले. 1997 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
1999 मध्ये मूर्तिजापूर विधानसभामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार म्हणून पहिला विजय प्राप्त केला. 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरही निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभा लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला. 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी विजय मिळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला. धोत्रे यांच्यातील नेतृत्वगुण हेरत भाजपकडून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार होता.
संजय धोत्रे हे कायमच भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक राहिले आहेत. अकोला जिल्ह्यात संजय धोत्रे यांनीच भाजपची पाळेमुळे रुजवली. त्यांना गावागावात जाऊन कार्यकर्ते पक्षाशी जोडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानसभा निवडणूक, त्यांचे परफेक्ट नियोजन विजय प्राप्त करू न देणारे ठरले. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसची पिछेहाट झाली.